दौंड, ता. १३ : दौंड तालुक्यातील केडगाव उपबाजारात ज्वारीची आवक वाढून बाजारभावात प्रतिक्विंटल ११५१ रुपयांची वाढ झाली. ज्वारीची १३२ क्विंटल आवक झाली असून प्रतवारीनुसार ज्वारीला किमान २९५०; तर कमाल ५१५१ रुपये बाजारभाव मिळाला.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारासह केडगाव येथील उपबाजारात भुसार मालाची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहे. तसेच, पाटस व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे, अशी माहिती सभापती गणेश जगदाळे, उपसभापती शरद कोळपे व सचिव मोहन काटे यांनी दिली. दौंड मुख्य बाजारात पालेभाज्यांची आवक स्थिर असून बाजारभावात वाढ झाली आहे.
केडगाव उपबाजारात कांद्याची तब्बल १०३५२ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान २००; तर कमाल १८०० रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. दौंड बाजारात कोथिंबिरीची ११७५३ जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ०७०० व कमाल २५०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची ८४३४ जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान १००० व कमाल २१०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला.
तालुक्यातील एकूण शेतमालाची आवक व बाजारभाव
शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रू.) कमाल (रू.)
गहू ६३३ २४०० ३१०१
ज्वारी १४६ २१०० ५१५१
बाजरी ४३० १७०० ३५००
हरभरा ०३९ ४७०० ५५००
मका ४३८ १५५० १९०१
उडीद ०३० ३८०० ५१००
तूर ००४ ६००० ६५००
मूग ००६ ७००० ८६००
दौंड बाजारातील भाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल भाव) : बटाटा - २१०, आले - ४०० , गाजर - ४००, पेरू - १५०, काकडी - ४००, भोपळा - १५०, कोबी - २७५, फ्लॅावर - २५०, टोमॅटो - २२५, हिरवी मिरची - ४५०, भेंडी -७००, कार्ली - ५६०, दोडका - ६५०, वांगी - ७०० शिमला मिरची - ५००, गवार - १५०० , घेवडा - ६००
टोमॅटो, काकडी व कोबी यांच्या भावात वाढ
लग्नसराईमुळे भाजीपाल्याची मागणी वाढली. दौंड मुख्य बाजारात टोमॅटोची २०५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान २५ तर कमाल २२५ रुपये, काकडीची ६२ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ७० तर कमाल ४०० रुपये आणि कोबीला कमाल २७५ रुपये असा बाजारभाव मिळाला.