देऊळगाव राजे, ता. १८ : आलेगाव (ता. दौंड) येथील दौंड शुगर साखर कारखाना चालू हंगाम सन २०२५-२६ मध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील सुमारे ५००० ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर ऊस शेतीमधील कृत्रिम बुद्धिमता (एआय) तंत्रज्ञान प्रकल्प राबविणार आहे. यामुळे दर एकरी ऊस उत्पादन व साखर उतारा वाढीसाठी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष जगदीश कदम व संचालक वीरधवल जगदाळे यांनी दिली.
ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन पुणे आणि दौंड शुगर कारखाना यांच्या संयुक्त सहकार्याने या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अंतर्गत प्रतिहेक्टर २५००० हजार प्रमाणे खर्च येत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये प्रकल्प राबविण्यासाठी कारखान्याकडे ९००० रुपये प्रतिहेक्टरी भरायचे असून, दौंड शुगर मार्फत ६७५० बिनव्याजी वसुली तत्त्वावर तसेच, व्हीएसआय मार्फत ९२५० या प्रमाणे आर्थिक साहाय्य शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे.
या प्रकल्पांतर्गत ऊस रोप लागवड करणे व ठिबक सिंचन यंत्रणा कार्यान्वित असणे महत्त्वाचे आहे. कारखान्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या ठिबक सिंचन योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन संचालक शहाजी गायकवाड यांनी केले आहे.
प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी दौंड शुगर कारखान्याने वरील संस्थांबरोबर सामंजस्य करारनामा केला असून, कारखान्याने त्या अनुषंगाने शेतकरी निवड प्रक्रिया सुरू केली आहे. या योजनेतील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेतकी विभागातील एकूण २२ कर्मचाऱ्याची प्रशिक्षक म्हणून नेमणूक करणार असल्याचे कारखान्याकडून सांगण्यात आले आहे. योजनेतील सहभागी शेतकऱ्यांना केव्हीके बारामती, व्हीएसआय पुणे यांच्या मार्फत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. याप्रसंगी केन व्यवस्थापक दीपक वाघ, मुख्य शेतकी अधिकारी संजय काकडे, ऊस विकास अधिकारी संदेश बेनके आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.