सचिन लोंढे : सकाळ वृत्तसेवा
कळस, ता. ३ : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याची गॅरंटी कोणता नेता घेणार? असा सवाल लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून केला जात आहे. प्रत्येक निवडणुकीत तालुक्यातील बावीस गावांचा पाणी प्रश्न असो, अथवा लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना असो, या प्रश्नावर परस्पर विरोधी नेत्यांनी आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.
लोकप्रतिनिधींकडून पाणी प्रश्न तडीस नेण्याच्या वल्गना केल्या आहेत. गेल्या पंचवार्षिकला उजनीतून मराठवाड्याला पाणी देण्याचा विषय चांगलाच गाजला. आता नीरा-भीमा नदी जोड प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यानंतर उजनीतून नीरा नदीचे पावसाळ्यातील अतिरिक्त सुमारे ७.५ टीएमसी पाणी मराठवाड्याला दिले जाणार आहे. मग तालुक्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढणे महत्त्वाचे असताना, तालुक्यातून पाणी मराठवाड्याला देणे म्हणजे येथील शेतकऱ्यांवर अन्याय करण्यासारखे असल्याचा आरोप शेतकरी करू लागले आहेत. यामुळे आता कालव्याच्या पाण्याची गॅरंटीच आम्हाला पाहिजे अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडू लागला आहे. एकीकडे उन्हाने रान तापले असताना दुसरीकडे आरोप प्रत्यारोपाने वातावरण गरम होऊ लागले आहे. केलेल्या विकासकामांची माहिती वेगवेगळ्या स्त्रोतामार्फत लोकांपर्यंत पोचविण्याचे काम जोमात सुरू आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत तालुक्यातील विविध विकासकामांसाठी कोट्यवधींचा आलेल्या निधीतून तालुक्यातील रस्ते, सभामंडप, सामाजिक इमारती, बंधारे, नाले यांसारखी अनेक विकासकामे यातून मार्गी लागली आहेत.
वितरिकांच्या दुरुस्तीसाठी निधी का नाही?
नेत्यांची मार्गी लागलेल्या कामांचे श्रेय घेण्यावरून तालुक्यातील वातावरण तापलेले पाहायला मिळाले. जेथे कच्च्या रस्त्याचे रूपांतर काँक्रिट रस्त्यात झाले, गावोगावची ग्रामदैवतांची मंदिरे देखणी झाली, तेथे कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये पाण्याअभावी वाळवंटाची स्थिती निर्माण होऊ लागली आहे. खडकवासला कालवा व वितरिकांच्या दुरुस्तीसाठी निधी का नाही? असा सवाल शेतकरी करत आहेत.
पाटबंधारे विभागाकडे कर्मचाऱ्यांचा दुष्काळ
खडकवासला पाटबंधारे विभागाच्या इंदापूर उपविभागाकडे पाण्याबरोबर कर्मचाऱ्यांचाही दुष्काळ असल्याची माहिती समोर आली आहे. शाखाधिकारी पदापासून ते शिपाई पदापर्यंतची सुमारे ८० पदे रिक्त असल्याचे समजते. इंदापूर, पळसदेव, लोणी-देवकर, शेटफळ या शाखांमध्ये शाखाधिकारी, कालवा निरिक्षक, दफ्तरी कारकून, कालवा चौकीदार, मोजणीदार, शिपाई, पाटकरी यांसारख्या कर्मचाऱ्यांचीच वाणवा आहे. मग कालव्याला पाणी आल्यानंतर तोकड्या कर्मचाऱ्यांवर पाणी वितरणाची जबाबदारी असते. दुरुस्तीच्या कामांबरोबर कर्मचारी वर्गाची नेमणूक महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे.
खडकवासला कालवा लाभक्षेत्रातील शेतीचे वाळवंट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पक्षिय जोडे बाजूला ठेवून कालव्याच्या पाण्यासाठी तोडगा काढण्याची भूमिका राजकीय नेत्यांनी घेणे गरजेचे आहे. कालव्याच्या जिवावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे पूर्ण अर्थकारण कोलमडले असून, त्यांना कायम दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोचल्यास त्याला मिळणाऱ्या घामाच्या दामातून कुटुंबांना सावरण्याची मिळणारी ताकद म्हणजे विकास आहे. विकासाची व्याख्या तालुक्यातील राजकारण्यांनी बदलण्याची गरज आहे.
- जनार्दन पांढरमिसे,सामाजिक कार्यकर्ते, रुई
02322
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.