कळस, ता. ३० ः खडकवासला कालव्याचे पाणी बोगद्यातून पुण्याबाहेर काढण्याच्या मागणीला मंजुरी मिळाली आहे. या कामामुळे कालव्याचे वाचणारे सुमारे अडीच ते तीन टीएमसी पाणी नेमके कोणाला मिळणार? याकडे इंदापूरकरांचे लक्ष लागले आहे.
इंदापूर तालुक्याला खडकवासला कालव्याचे पाणी वेळेवर व पुरेसे मिळत नसल्याची तक्रार गेल्या काही वर्षांपासून होत आहे. मात्र, याकडे पाटबंधारे विभाग गांभिर्याने पाहत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. तालुक्यातील प्रकल्प आराखड्यातील लाभक्षेत्रापैकी केवळ नऊ ते १० टक्के क्षेत्र सिंचित होत आहे. कालव्याचे पाणी दुर्मिळ झाल्यामुळे सिंचन व्यवस्था कोलमडून पडली आहे. पुण्याच्या भरमसाट पाण्याच्या मागणीमुळे तालुक्यातील खडकवासला कालव्यावरील सिंचन व्यवस्था नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे खडकवासला कालवा पाणी संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून मूळ प्रकल्प सिंचन आराखड्यात इंदापूरसाठी मंजूर असलेले पाणी मिळण्यासाठी लढा उभारण्यात आला आहे.
तालुक्यातील सिंचनासाठी सुमारे ३.९ टीएमसी पाणी मोजून मिळावे, अशी मागणी कृती समितीकडून करण्यात येत आहे. याशिवाय बोगद्यामुळे वाचणारे पाणी नेमके कोणाला दिले जाणार आहे? किंवा यावर नवीन वेगळी सिंचन योजना मंजूर केली जाणार आहे? हे पाटबंधारे विभागाने स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
इंदापूर तालुका खडकवासला कालव्याचा टेलचा तालुका आहे. तालुक्याच्या वेशीवर कालव्याचे पाणी प्रवेश करण्यासाठी सुमारे १४६ किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. यानंतर तालुक्यातील सुमारे ५६ किलोमीटर कालव्याची लांबी, त्यावरील ३६ ते ६० ब वितरीकांच्या माध्यमातून लाभक्षेत्रातील शेतीला सिंचनासाठी कालव्याचे पाणी मिळणे अभिप्रेत आहे. वास्तविक कालव्याचे आवर्तन सुरू झाल्यानंतर येणारा पाण्याचा प्रवाह केवळ शंभर ते दीडशे क्युसेकच्या आसपास असतो. यामुळे कालव्याच्या वितरिकांतून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचत नाही. ज्याठिकाणी पाणी पोचत नाही, ते लाभक्षेत्र कमी करून त्यांच्या वाटणीचे पाणी जानाई-शिरसाई योजनेला देण्यात आल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. पुण्याची वाढती पाण्याची मागणी, इंदापूर तालुक्यातील कालवा व वितरिकांची दुरवस्था, दौंड व हवेलीत मोठ्या प्रमाणात होणारी पाण्याची गळती व चोरी यामुळे तालुक्याचे हक्काचे पाणी शेतकऱ्यांना मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. यामुळे इंदापूरकरांच्या हक्काचे पाणी मोजून देण्याची तरतूद करण्याबरोबर बोगद्यामुळे वाचणारे अडीच ते तीन टीएमसी पाणी कोणाला देण्यात येणार आहे, याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी इंदापूर तालुका खडकवासला कालवा पाणी संघर्ष कृती समितीने केली आहे.
लाभक्षेत्र
- सध्याचे अपेक्षित लाभक्षेत्र - सुमारे १५ हजार ९६८ हेक्टर
- प्रत्यक्ष सिंचित होणारे क्षेत्र - १५०० हेक्टर (९.४० टक्के)
- तालुक्यातील कालव्याची लांबी सुमारे ५६ किलोमीटर
- कालव्यावरील वितरिकांची संख्या -२६, शाखा - ४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.