केसनंद, ता. ६ : पेरणे (ता. हवेली) येथे पुणे- अहिल्यानगर हमरस्त्यापासून पेरणे गावात पाचपीर देवस्थानपर्यंत जाण्यासाठी, तसेच पेरणेफाटा येथील जयस्तंभाकडे जाणारा पर्यायी मार्ग असलेला दोन किलोमीटर अंतराचा रस्ता ३० वर्षांनंतर खुला करण्यात आला आहे.
प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न सुटल्यामुळे स्थानिक शेतकरी, ग्रामस्थांसह एक जानेवारीला जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पर्यायी मार्गाने येणाऱ्या अनुयायांचीही मोठी सोय होणार आहे. या रस्त्यातील अतिक्रमणामुळे शेतकऱ्यांना टोल नाक्यापासून गावात ये- जा तसेच, शेतीमालाची ने- आण करता येत नव्हती. त्यामुळे शेतमालाच्या नुकसानीसह शेतकरी बांधवांचीही गैरसोय होत होती. अनेक वर्षे प्रयत्न करूनही हा प्रश्न सुटलेला नव्हता. मात्र, सर्व घटकांशी वारंवार चर्चेतून व विश्वासात घेऊन हा प्रश्न सोडवण्यात ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ व महसूल प्रशासनाला अखेर यश आले.
ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे महसूल प्रशासनानेही यात गांभीर्याने लक्ष घालून अतिरिक्त तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या आदेशानुसार सुमारे दोन किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या हद्दी मोजणीद्वारे निश्चित करण्यात आल्या. तसेच, ४०० मीटर अंतरातील अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात काढण्यात आले. सुमारे १० फूट रुंदीचा रस्ता ग्रामस्थांसाठी खुला करण्यात आला.
या रस्ता खुला करण्याच्या कार्यवाहीत मंडल अधिकारी संदीप झिंगाडे, तलाठी संतोष इडोळे, ग्रामसेवक दादाभाऊ नाथ या अधिकाऱ्यांसह सरपंच उषा दशरथ वाळके, उपसरपंच अंकिता सरडे, अशोक कदम, सुजित वाळके, अक्षय वाळके, दत्तात्रेय ढेरंगे आदींचा सहभाग होता. या कारवाईवेळी महसूल अधिकाऱ्यांसह मोठा पोलिस बंदोबस्तही ठेवला होता.
शेतकरी, ग्रामस्थांमध्ये समाधान
वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न ग्रामस्थांनी टाकलेल्या विश्वासामुळे सर्वांच्या सहकार्याने केवळ अडीच- तीन वर्षांत सोडवता आल्याने शेतकरी, ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
05193