केडगाव, ता. २५ : प्रत्येक भारतीय सैनिकाचं एक स्वप्न असतं शत्रूंवर गोळ्या झाडण्याचं. पण हे भाग्य प्रत्येकाच्या नशिबी येतचं असं नाही. मी त्या भाग्यवानांपैकी एक आहे. कारगिल युद्धात आम्ही शत्रूवर बेछूट गोळीबार करत विजयसुद्धा मिळविला. खडतर प्रशिक्षणातील प्रत्येक गोष्ट युद्धात कामाला आली. कारगिल युद्धात प्रत्यक्ष भाग घेतलेले आलेगाव (ता.दौंड) येथील बाळासाहेब भोसले विजयगाथा सांगताना भाराऊन गेले होते. कारगील विजय दिवसानिमित्त शनिवारी (ता. २६) त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कारगिल विजयदिनानिमित्त भोसले यांची भेट घेतली असता त्यांनी युद्धाच्या आठवणींना उजाळा दिला. भोसले यांच्या कुटुंबात सैन्याची मोठी पार्श्वभूमी. कुटुंबातील तीन चुलते लष्करात होते. तर वडील रेल्वे कर्मचारी. बाळासाहेब शाळेत जास्त रमले नाही. एकदा शिक्षक गमतीने म्हणाले, ‘‘बाळू तू दहावी पास होणार नाही. त्यापेक्षा मिल्ट्रीत जा.’’ सहज दिलेला सल्ला बाळासाहेबांनी गांभीर्याने घेतला. कुटुंबात लष्कराची पार्श्वभूमी होतीच. यामुळे ते १९८४ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी ते भरती झाले. तेव्हा ते नववीत होते.
काश्मीरमधील कार्यकाल संपवून १९९९ मध्ये ते पीस पोस्टिंगसाठी पुणे येथे यायला निघाले होते. मात्र त्याच वेळी त्यांना कारगिल युद्धावर जाण्याचा आदेश मिळाला. तेव्हा एक क्षणही न दवडता ते युद्धभूमीच्या दिशेने निघाले. बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये, कडाक्याच्या थंडीमध्ये, रात्रीच्या अंधारात त्यांच्या तुकडीची चढाई सुरू झाली. उंचीवर प्राणवायू कमी होता. दिवसा, दगडाच्या आड लपून शांत बसायचं, आणि रात्रीच्या काळोखात रणांगण सर करायचं ही त्यांची लढण्याची रणनिती होती.
भोसले म्हणाले, युद्धाचे वर्णन शब्दात करणे अवघड आहे. टायगर हिलवर चढाई करणे म्हणजे मृत्यूच्या दरवाजातून पार जाण्यासारखं होतं. त्या क्षणी मनात एकच विचार आला जिंकू किंवा मरू! आम्ही पाकिस्तानी सैन्यावर तुटून पडलो. हजारो सैनिकांनी टायगर हिलला वेढा घालून शत्रूला गारद करत विजय मिळवला. प्रत्यक्ष लढाईत आम्ही सुमारे २० दिवस होतो. विजय मिळाला पण सहकारी गमावल्याचे दुःख आजही आहे.
सैन्याची नोकरी म्हणजे केवळ रोजगार नाही, ती एक कर्तव्य भावना, सन्मान आणि त्यागाची शिखरं गाठणारी वाटचाल आहे. लष्कराने भोसले यांना कारगील विजय पदक बहाल केले आहे. निवृत्तीनंतर ते उत्तम शेती करत असून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दौंड शाखेत सुरक्षारक्षक म्हणून काम करत आहे.
प्रशिक्षणाचे खरे मूल्य तेव्हा समजले. तीन दिवस उपाशी ठेवणाऱ्या ट्रेनिंगपासून ते रणगाडा चालविण्याच्या कौशल्यापर्यंत सगळी तयारी या युद्धात उपयोगी आली. मी कमांडो ट्रेनिंग घेतलेले होते. आणि तिचा प्रत्यय कारगिलच्या रणांगणात आला. त्या दिवशी वाटलं, ''हो, या प्रशिक्षणामुळेच आज मी इथे उभा आहे..
- बाळासाहेब भोसले
03866, 03867
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.