निमगाव केतकी, ता. १० : गोतोंडी (ता. इंदापूर) हद्दीतील नीरा डाव्या कालव्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात झाडे व झुडपे वाढलेली आहेत. मोठा असणारा कालवा या झाडाझुडपांच्या गर्दीमध्ये शोधणे मुश्कील झाले आहे. पाटबंधारे खात्याने तातडीने कालव्याची स्वच्छता करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.
चोपन्न फाटा ते गौतमेश्वर मंदिराच्या पुढे या तीन किलोमीटर भागामध्ये कालव्याच्या आतील बाजूला व भरावाच्या बाहेरच्या दोन्ही बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणात झाडे व झुडपे वाढलेली आहेत. कालव्यामध्ये मोठा अडथळा निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी पाण्याचा प्रवाह देखील मंदावतो. तसेच, पाण्याबरोबर अनेकवेळा मृत जनावरे वाहून येतात, ती या परिसरामध्ये झाडात अडकून राहतात व सडल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो.
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ५४ फाटा येथून पुढे जाताना या ठिकाणच्या कालव्यामध्ये अनेक वारकरी अंघोळ करतात. तसेच, कपडे धुतात. मात्र, अलीकडे या झाडा-झुडपांमुळे त्यांना कालव्यामध्ये जाता येत नाही. पाटबंधारे विभागाने तातडीने या पट्ट्यातील कालव्यामधील झाडे- झुडपे काढून कालवा स्वच्छ करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
सध्या पोकलेन मशिन इतर ठिकाणच्या कामावर आहेत. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मशिन मिळाल्यानंतर या ठिकाणची झाडे- झुडपे काढून कालवा स्वच्छ करण्यात येणार आहे.
-डी. पी. एकतपुरे, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग
02966