कोळवण, ता. २६ : मुळशी तालुक्यातील महसूल प्रशासन सांभाळणारे तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी हे पद १६ जून पासून रिक्त आहे. प्रशासनाने प्रभारी तहसीलदार म्हणून जयराज देशमुख यांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती केली आहे. परंतु प्रभारी तहसीलदार असण्यापेक्षा तालुक्यासाठी कायमस्वरूपी तहसीलदारांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. यावर डुडी यांनी मुळशी तालुक्यासाठी आठ दिवसांत नवीन तहसीलदाराची नेमणूक केली जाईल असे आश्वासन दिले आहे. याप्रसंगी मनसे पुणे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र गारुडकर, उपजिल्हाध्यक्ष गणेश जोरी, जिल्हा सचिव सागर खंडाळे, मुळशी तालुका अध्यक्ष धनंजय टेमघरे, संघटक सोमनाथ कवडे, जनहित कक्ष अध्यक्ष कोंडिबा साठे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भरतवंशी उपस्थित होते.