शिक्रापूर, ता. १५ ः २० पेक्षा कमी पट असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याच्या शासन निर्णयाच्या विरोधात तब्बल १९ शिक्षक संघटनांनी राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय पुण्यात घेतला. टप्प्याटप्प्याने तीव्र केले जाणाऱ्या या आंदोलनाला मंगळवारपासून (ता.१७) सुरुवात केली जाणार आहे. बुधवारी(ता.२५) राज्यभरातील सर्व शिक्षक सामुहिक रजेवर जाऊन ठिकठिकाणी मोर्चे काढणार आहे, अशी माहिती शिक्षक संघटनेचे (शिवाजीराव पाटील गट) राज्याध्यक्ष केशवराव जाधव यांनी दिली.
पुणे येथे शिक्षक भवनात निर्णयाविरोधात प्राथमिक शिक्षक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी (ता.१४) पार पडली. या बैठकीतील निर्णयानुसार मंगळवारपासून (ता.१७) राज्यभरातील सर्व शिक्षकांनी काळी फीत लावून विरोध दर्शविणे, बुधवारपासून (ता. १८) प्रशासनिक व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडून शासन असहकार पुकारणे आणि (ता. २५) रोजी राज्यभरातील सर्व शिक्षकांनी सामुहिक रजेवर जात आपल्या जिल्ह्यात मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. तशी माहिती शासनालाही कळविण्याचे जाधव यांनी सांगितले.
शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने १५ मार्च २०२४ रोजी संचमान्यतेचा व ५ सप्टेंबर २०२४ रोजी २० अथवा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील एक शिक्षक पद बंद करून कंत्राटी पद्धतीने सेवा निवृत्त शिक्षक व डी.एड किंवा बी.एड शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही निर्णयांनी विद्यार्थ्यांचे शिक्षणच बंद होण्याची भीती आहे. अशा निर्णयांनी बालकांना दर्जेदार शिक्षणापासून दूर लोटण्याचा प्रकार होत असल्याने सर्व शिक्षक संघटनांचा विरोध होत आहे.
बैठकीला प्राथमिक शिक्षक संघटना निर्धार बैठकीचे अध्यक्ष तथा शिक्षक संघाचे (शिवाजीराव पाटील गट) राज्याध्यक्ष केशवराव जाधव, संभाजीराव थोरात, उदय शिंदे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे, प्रसाद पाटील, राजेश सुर्वे, शिवाजीराव साखरे, किरण पाटील, चिंतामणी वेखंडे, नवनाथ गेंड, अनिल पलांडे, प्रभाकर झोड, सतीश कांबळे, यादव पवार, नीलेश देशमुख, साजिद अहमद, तुषार पाटील, राजू जाधव, उत्तरेश्वर मोहलकर, मधुकर काठोळे, विकास खांडेकर, राजन कोरगांवकर, राजन सावंत, पल्लवी गायकवाड, प्रकाश घोळवे, अंकुश काळे, पवन सूर्यवंशी, एस के पाटील, संजय नाईक, संजय जाधव, तुषार पाटील, शशिकांत पोवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.