काटेवाडी, ता. ८ : खरीप हंगामामध्ये डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) खताच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी), ट्रिपल सुपर फॉस्फेट (टिएसपी) आणि एनपीके या पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पर्यायी खतांमुळेही पिकांचे उत्पादन वाढेल, जमिनीची सुपीकता टिकेल आणि शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल, असा अंदाज ही कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
खरीप हंगाम २०२५ ला सुरुवात झाली असून, डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) खताची मागणी वाढली आहे. डीएपीमध्ये १८ टक्के नत्र आणि ४६ टक्के स्फुरद असते. परंतु या खतांच्या तुटवड्यामुळे आणि वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांना पर्यायी खतांचा अवलंब करणे आवश्यक झाले आहे. राज्य सरकार मृदा परीक्षण आणि जमीन आरोग्य पत्रिकांद्वारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली लागू करत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीच्या गरजेनुसार खतांचा वापर करता येईल. कृषी विभागाने शेतकऱ्यांना डीएपीवर अवलंबून न राहता पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक कृषी केंद्रे आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि पुरवठा उपलब्ध आहे. यामुळे खरीप हंगामात उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचा खर्च कमी होईल.
पर्यायी खतांचे महत्त्व....
डीएपीच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना पिकांच्या अन्नद्रव्य गरजा पूर्ण करण्यासाठी पर्यायी खतांचा वापर करणे गरजेचे आहे. कृषी विभागाने सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी), ट्रिपल सुपर फॉस्फेट (टिएसपी) आणि संयुक्त खते (एनपीके) यांचा वापर सुचवला आहे. ही खते स्थानिक पातळीवर उपलब्ध आहेत.
सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी)....
एसएसपी हे देशात उत्पादित होणारे खत असून, त्यात १६ टक्के स्फुरद, ११ टक्के गंधक आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. गंधकामुळे सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल यासारख्या तेलबिया पिकांसाठी हे खत फायदेशीर आहेत. डीएपीच्या एका गोणी (५० किलो) ऐवजी अर्धी गोणी युरिया (२५ किलो) आणि तीन गोण्या एसएसपी (१५० किलो) वापरल्यास स्फुरद आणि नत्राची कमतरता भरून निघते. यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते.
ट्रिपल सुपर फॉस्फेट (टिएसपी)
टिएसपीमध्ये ४६ टक्के स्फुरद असते. याचे प्रमाण डीएपीइतकेच आहे. डीएपीच्या एका गोणीऐवजी अर्धी गोणी युरिया आणि एक गोणी टीएसपी (५० किलो) वापरल्यास पिकांना आवश्यक अन्नद्रव्ये मिळतात. हे खत कापूस, मका आणि ऊस यांसारख्या पिकांसाठी उपयुक्त आहे. तसेच यामुळे खर्चात बचत होते.
संयुक्त खते (एनपीके)
एनपीके १०:२६:२६, १२:३२:१६, १५:१५:१५ आणि २०:२०:०:१३ यांसारख्या संयुक्त खतांमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश यांचे संतुलित मिश्रण असते. एनपीके २०:२०:०:१३ मध्ये १३ टक्के गंधक आहे, जे तेलबिया आणि कडधान्य पिकांसाठी फायदेशीर आहे. ही खते पिकांच्या वाढीस आणि फळधारणेसाठी उपयुक्त आहेत.
कृषी विभागाच्या सूचना
* मृदा परीक्षण: जमिनीच्या सुपीकतेनुसार खतांचा वापर करण्यासाठी मृदा परीक्षण करा.
* पर्यायी खतांचा वापर: डीएपीऐवजी एसएसपी, टिएसपी आणि एनपीके खतांचा वापर करा.
* योग्य प्रमाण: डीएपीच्या एका गोणीऐवजी युरिया आणि पर्यायी खतांचे योग्य मिश्रण वापरा.
* स्थानिक उपलब्धता: स्थानिक कृषी केंद्रातून खतांची माहिती आणि पुरवठा मिळवा.
पर्यायी खतांचा वापर केवळ डीएपीच्या तुटवड्यावर मात करत नाही, तर जमिनीची दीर्घकालीन सुपीकता आणि पर्यावरण संरक्षणाला हातभार लावतो. गंधकयुक्त खतांमुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि रासायनिक खतांचा अतिवापर कमी होतो.
- संजय काचोळे, जिल्हा कृषी अधीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.