लोणी काळभोर, ता. २४ : नर्सरी व्यवसायात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची सुमारे चार लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोरतापवाडी (ता. हवेली) येथील दाम्पत्याविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दाम्पत्य फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
किशोर लक्ष्मण साठे (वय ३५) आणि अर्चना किशोर साठे (वय २६) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महेंद्र बाबू जैनजांगडे (वय ३९, रा. सिद्राममळा, रामदरा रोड, लोणी काळभोर) यांनी फिर्याद दिली आहे. रिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२५ मध्ये किशोर साठे याने जैनजांगडे यांना नर्सरी व्यवसाय सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता. “तुमच्या पत्नीला नर्सरीचा अनुभव असल्याने हा व्यवसाय फायदेशीर ठरेल,” असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला.
त्यावर विश्वास ठेवून जैनजांगडे यांनी १ नोव्हेंबर २०२५ला दोन लाख रुपये धनादेशाद्वारे, तर दोन लाख रुपये रोख स्वरूपात साठे याला दिले. मात्र व्यवसाय सुरू करण्याबाबत सातत्याने टाळाटाळ करण्यात आली. पैसे परत मागितल्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये २ लाख २० हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला; मात्र तो बँकेत जमा केल्यानंतर वटला नसल्याचे समोर आले. दरम्यान, चौकशीत साठे दाम्पत्याने परिसरातील इतर नागरिकांनाही विविध व्यवसायांचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. फकिर इनामदार, परविंदर दिगवा, लकी दिगवा, बाळासाहेब म्हेत्रे यांच्यासह अन्य काही जणही या फसवणुकीचे बळी ठरल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आरोपी दाम्पत्याचे मोबाइल बंद असून त्यांनी पुणे शहर सोडून पलायन केल्याची माहिती आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.