माळेगाव, ता. १ : माळेगाव (ता. बारामती) कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार शुभारंभाचा नारळ फोडण्याचे नियोजन सत्ताधारी व विरोधकांनी सोमवारी (ता. २) केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माळेगाव येथे सत्ताधाऱ्यांचा प्रचाराचा प्रारंभ होणार आहे, तर विरोधी नेते चंद्रराव तावरे, रंजन तावरे हे सांगवी गावातून प्रचाराचा प्रारंभ करणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी गावोगावी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. वास्तविक सत्ताधारी व विरोधकांच्या बाजूने गटनिहाय संभाव्य उमेदवारांमध्ये तिकीट वाटपाची कसरत सुरू आहे. मात्र, या नेते मंडळींनी प्रचाराच्या माध्यमातून रान तापविण्याचा प्रयत्न केला आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी आठच दिवस (१३ ते २१ जून) दिले आहेत, तर मतदान कार्यक्रमातून उमेदवारांनी माघार घेण्यासाठी पंधरा दिवस (२९ मे ते १२ जून) दिले आहेत. याचा विचार करता अधिकृत उमेदवार व कार्यकर्त्यांची प्रचारासाठी तारांबळ होऊ नये, या उद्देशाने उमेदवारी अर्ज माघारी घेण्याअगोदरच प्रचाराचा प्रारंभ करण्याचे नेते मंडळींनी नियोजन केले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे व विरोधकांचे अधिकृत पॅनेल अद्याप जाहीर झाले नाही. असे असतानाही विरोधी गटाचे संभाव्य उमेदवार मतदारांच्या घरोघरी जात आहेत. त्यामध्ये माळेगाव गटातून संभाव्य उमेदवार रंजन तावरे, रमेश गोफणे, संग्राम काटे यांनी गाठीभेटींवर भर दिला आहे. त्या तुलनेत माळेगाव गटात राष्ट्रवादीचे उमेदवार तिकिटाच्या तिढ्यात अडकले आहेत. तशीच काहीशी परिस्थिती इतर गटात आहे. त्याची दखल घेत अजित पवार राष्ट्रवादीच्या पॅनेलच्या प्रचाराला वेग देण्यासाठी सोमवारी प्रचार शुभारंभाची सभा घेणार आहेत. विरोधकांच्या आक्षेपार्ह मुद्यांवर प्रचार सभेत अजितदादा, बाळासाहेब तावरे, अॅड. केशवराव जगताप हे नेते निर्भीड व सडेतोड उत्तर देण्यास सज्ज आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी कळविली.
राजकीय धडे शिकविणारी निवडणूक
माळेगाव कारखान्याची निवडणूक ही तालुकास्तरावर काम करणाऱ्या नेतेमंडळींच्या दृष्टीने प्रतिष्ठेची मानली जाते. तसेच, तरुणांना राजकीय धडे शिकविणारी हीच निवडून महत्त्वाची असते. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक पुढे जाहीर होणाऱ्या पॅनेलमध्ये जुन्या चेहऱ्यांना पसंती देतात, की नव्या चेहर्यांचा करिष्मा पाहण्याचे धाडस दाखवितात, या उत्सुकतेच्या समीकरणाकडे सर्वांचे लक्ष आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.