महाळुंगे पडवळ, ता. ३१ : बेंगळुरू येथे पार पडलेल्या २९ व्या नॅशनल स्पोर्ट्स क्लाइंबिंग चॅम्पयनशिप स्पर्धेत महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथील ध्रुवी गणेश पडवळ या विद्यार्थिनीने सुवर्णपदक पटकाविले आहे. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातील नामांकित खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत अटीतटीच्या लढतीत ध्रुवीने आपल्या वेग, तंत्र आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अव्वल स्थान मिळवून पुण्याचे नाव उज्ज्वल केले आहे. ध्रुवी ही राजे शिवाजी क्लाइंबिंग वॉल, तसेच पिंपळे सौदागर येथील क्लाइंबिंग वॉल येथे नियमित सराव करत आहे. तीला प्रशिक्षक अमोल जोगदंड, मांतु मंत्री आणि इरफान शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन, योग्य प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण पाठबळ लाभले आहे. ध्रुवीने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे महाळुंगे पडवळ ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
गेल्या महिन्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत झालेल्या आय.एफ.एस.सी आशियायी किड्स क्लाइंबिंग चॅम्पयनशिप आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १३ देशांतील सुमारे २०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. तेरा वर्ष वयोगटातील गर्ल्स स्पीड क्लाइंबिंग विभागातही ध्रुवीने सुवर्णपदक पटकाविले होते. किड्स क्लाइंबिंग चॅम्पयनशिप स्पर्धेत आतापर्यंत तिला २२ सुवर्णपदक, पाच रौप्यपदक व पाच कास्यपदक अशी एकूण ३२ पदके मिळालेली आहेत. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय पदकांचाही समावेश आहे.
03532