नारायणगाव, ता. ३ : महायुती सरकार शेतकरी व सर्वसामान्यांचे आहे. यामुळे प्रवाही व उपसा जलस्रोतांची पाणीपट्टी पूर्वीच्या (जुन्या)दराने आकारली जाईल. पाणीपट्टीत वाढ केली जाणार नाही, अशी भूमिका उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केली.
जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी वाढीव पाणीपट्टीच्या संदर्भात राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्नासंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांनी आपली भूमिका जाहीर केली. या निर्णयामुळे कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१ अंतर्गत पाणीपट्टी भरणाऱ्या जुन्नर तालुक्यातील साडेआठ हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्यातील जलसंपत्तीचे विनियमन करण्याकरिता, तसेच जलसंपत्तीचे कुशल समन्याय व टिकाऊ व्यवस्थापन, वाटप व वापर सुकर करण्याकरिता व पाण्याचे दर निश्चित करण्याकरिता महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम २००५ पारित केले आहे. सध्या शेतकरी वर्ग अडचणीत व दुष्काळी स्थिती असताना पाणीपट्टीत एकदम दहा टक्के वाढ होणार असल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत होता. पाणीपट्टीच्या वाढीव दराला शेतकरी व विविध संघटनांनी विरोध केला होता. कोणत्याही परिस्थितीत वाढीव दराने पाणीपट्टी न भरण्याचा निर्णय जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी जाहीर केला होता.
या बाबत आमदार अतुल बेनके यांनी विधानसभा अधिवेशनात व राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वाढीव पाणीपट्टीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सहानुभूतिपूर्वक निर्णय घेऊन पाणीपट्टी आहे तीच ठेवावी, अशी मागणी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार बेनके यांनी केली. यावेळी मुख्यमंत्री पवार यांनी पूर्वीच्या दराने पाणीपट्टी आकारली जाईल, असे जाहीर केले.
शेतकरी वर्ग अनेक अडचणींचा सामना करत आहे. केंद्र शासनाच्या कांदा, सोयाबीन,साखर, कापूस निर्यात बंदीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सतत पडणारा पाऊस, हवामानातील बदल, बाजारभावाचा अभाव या मुळे जुन्नर तालुक्यातील द्राक्ष, कांदा उत्पादक आर्थिक अडचणीत आहेत. पाणीपट्टीत एकदम दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय अन्यायकारक होता. आमदार अतुल बेनके यांनी याबाबत आवाज उठवल्याने व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिसाद देऊन योग्य भूमिका जाहीर केल्याने शेतकऱ्यांना तूर्त दिलासा मिळाला आहे.
- गुलाबराव नेहरकर, माजी सरपंच ग्रामपंचायत, येडगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.