नसरापूर, ता. 14 : पुणे जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या गणांच्या प्रारूप रचनेवरील हरकतींवरील सुनावणी पूर्ण झाली असून, भोर तालुक्यातील गट- गण रचनेत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे इच्छुकांची राजकीय गणिते बदलली आहेत.
तेलवडी (ता. भोर) येथील चेतन पोपट धावले यांनी भोंगवली गटातील रचनेबाबत हरकत दाखल केली होती. त्यामध्ये त्यांनी नमूद केले होते की, भोंगवली गटामध्ये वर्तुळाकार पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे संगमनेर गण आणि भोंगवली गण या दोन्हीमध्ये तांबाड, हातवे खुर्द आणि हातवे बुद्रुक या गावांचा एकत्रित समावेश होऊ शकत नाही. धावले यांनी या गावांना भोंगवली गटातून व संगमनेर गणातून वगळून वेळू गटात समाविष्ट करण्याची मागणी केली. त्यांचे म्हणणे आहे की, भौगोलिक दृष्ट्या ही गावे नसरापूर गणाला लागून आहेत. सदर वेळू विभाग हा वेळू गण आणि नसरापूर गण अशा दोन भागांत विभागलेला आहे. वेळू गणात महामार्गावरील गावांचा समावेश आहे, तर नसरापूर गणात गुंजवणी नदीलगतची गावे आहेत. तांबाड, हातवे खुर्द आणि हातवे बुद्रुक ही तिन्ही गावे गुंजवणी नदीलगत असल्याने वर्तुळाकार पद्धत व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांचा समावेश नसरापूर गणात (पर्यायाने वेळू गटात) करावा. तसेच, लोकसंख्येचा समतोल राखण्यासाठी उंबरे, कामथडी आणि करंदी ही गावे संगमनेर गणात समाविष्ट करावीत.
तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांनी याबाबत आपापले अभिप्राय मांडल्यानंतर यावर विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सुनावणी करत निर्णय दिला. त्यामध्ये, अर्जदार यांनी केलेली मागणी ही भौगोलिक संलग्नता व लोकसंख्येच्या निकषात बसत आहे. त्यामुळे अर्जदार यांची सदरची हरकत मान्य करण्यात आली असून, संगमनेर गणातील हातवे खुर्द, हातवे बुद्रुक व तांभाड ही गावे वगळता नसरापूर गणात घेण्यात आली आहेत, तर नसरापूर गणातील उंबरे, कामथडी व करंदी ही गावे संगमनेर गणात समाविष्ट करण्यात आली आहेत. संगमनेर या ग्रामपंचायतीची लोकसंख्या ही १९५९ अशी आहे. तसेच, कामथडी या ग्रामपंचायतीची लोकसंख्या ही २४५२ आहे. त्यामुळे या गणाचे नाव संगमनेर- गणाऐवजी कामथडी गण असे करण्यात आले आहे.
या बदलांमुळे राजकीय गणिते कोलमडली असून आगामी निवडणुकीत बराचसा फरक पडणार आहे. या भागातील जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी दिग्गज इच्छुकांना त्यांच्या राजकीय व पक्षिय विरोधकांनी कोंडीत पकडल्याचा चर्चा तालुक्यात होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.