नसरापूर, ता. ४ : घर व कार्यालयापासून अवघ्या काही किलोमीटरवर होणारे हवाई हल्ले, कोसळलेल्या इमारती त्यामुळे नागरिकांची झालेली घबराहट, कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रचंड तणाव व येणारी मायदेशाची आठवण हा अनुभव कथन केला आहे, आखातातील बहारिन या देशात वास्तुविशारद (आर्किटेक्ट) नसरापूर (ता. भोर) येथील ज्ञानेश नरहरी पालकर यांनी.
अमेरिका-इस्राईल व इराण यांच्या युद्धाचा फटका आखाती प्रदेशातील बहारिन या छोट्या देशाला देखील बसला आहे. इराणवरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी बहारीन, कुवेत, कतार, युएई या प्रदेशातील अमेरिकेच्या संबंधित लष्करी स्थळांना इराणने लक्ष्य केले आहे. यामुळे आखाती राज्यांमधील नागरिक आणि परदेशी रहिवाशांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. ज्ञानेश पालकर हे गेली ११ वर्षांपासून बहारिन येथे वास्तुविशारद म्हणून कार्यरत आहेत त्यांनी सांगितले की, अमेरिका -इस्राईल व इराण युद्ध सुरू झाल्याची आम्हाला माहिती होती; परंतु बहारीनवर लगेच हल्ला होईल याची कल्पना नव्हती. बहारीनमधल्या जुफेरबेल येथे असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळाला या हल्ल्यात लक्ष्य केले गेले. बहारिन देशाचे क्षेत्रफळ फारच थोडे आहे, त्यामुळे अवघ्या काही किलोमीटरवर झालेल्या या हल्ल्याने आम्ही सर्वच भयभीत झालो होतो. आम्ही वुमलहसम या भागात राहतो येथील स्थानिक अधिकाऱ्यांनी संरक्षण व आपत्कालीन यंत्रणा तातडीने सक्रिय केल्या व नागरिकांना अधिकृत माहितीवर अवलंबून राहण्याचे सांगण्यात आले. पूर्ण दोन दिवस आम्ही घरातच राहिलो. मुलांची शाळा बंद आहे. हल्ले होतच आहेत; परंतु हवाई संरक्षण यंत्रणेने ते परतून लावल्याचे सांगण्यात आले. दोन दिवसांनंतर आमचे कार्यालय सुरू झाले; परंतु कार्यालयातील सहकारी देखील कमालीचे अस्वस्थ होते. नेमके केव्हा काय होईल हे सांगता येत नव्हते, अशा तणावग्रस्त परिस्थितीत आपला देश, आपली माणसे तेथील शांतता व एकमेकांचा विचार करणारी कुटुंबव्यवस्था, मित्रमंडळ,गावकरी यांची प्रखरतेने आठवण येते.
कुटुंब सतत संपर्कात
नसरापूर गावामध्ये पालकर यांचे वडील, आई, दोन चुलते, काकी,चुलत भाऊ असे मोठे एकत्र कुटुंब आहे, त्यांना देखील ज्ञानेश यांच्याबद्दल काळजी आहे. ते ज्ञानेश यांच्याशी फोनवर सतत संपर्कात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.