न्हावरे, ता. ८ : ओंकार शुगर ग्रुपच्या श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) तालुक्यातील हिरडगाव येथील गौरी शुगर कारखान्याने उसाला प्रतिटन तीन हजार २०० रुपये बाजारभाव जाहीर केला आहे. यामधील पहिल्या हप्त्यापोटी प्रतिटन तीन हजार १०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांवर लवकरच जमा केले जातील, तर उर्वरित १०० रुपये दिवाळीच्या दरम्यान जमा केले जातील, अशी माहिती ‘ओंकार ग्रुप’चे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांनी दिली.
गौरी शुगर कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता सात हजार ५०० टनाची असताना कारखान्याने दोन दिवसांपूर्वी आठ हजार ५६६ टनाचे गाळप करून विक्रम केला आहे. कारखान्याने आजअखेर दोन लाख ३३ हजार टनाचे गाळप केले असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, याचे सर्व श्रेय ऊसउत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूकदार व व्यवस्थापकांना जाते.
शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार घोडगंगा सहकारी साखर कारखाना गेली तीन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी गौरी शुगर कारखान्याला मोठ्या प्रमाणावर ऊस देत आहेत. दरम्यान, अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यात खासगी साखर कारखान्यामध्ये गौरी शुगर या साखर कारखान्याने गतवर्षी दिलेल्या चांगल्या बाजारभावामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरामध्ये अनेक कारखान्याच्या ऊसतोडणी कामगार दाखल झाले आहेत मात्र, या भागातील शेतकरी गौरी शुगरची टोळी कधी मिळेल या प्रतिक्षेत आहेत.
याबाबत कारखान्याचे महाव्यवस्थापक रोहिदास यादव म्हणाले की, मागील तीन वर्षांपासून गौरी शुगर कारखाना सातत्याने शेतकऱ्यांच्या उसाला चांगला बाजारभाव देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत आहे. शेतकऱ्यांनी शंका मनामध्ये न ठेवता व ऊस घालवण्यासाठी गाई न करता गौरी शुगर कारखान्यास जास्तीत जास्त ऊस देऊन गाळपाचे १० लाख टनांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता सहकार्य करावे.
‘गौरी शुगर’मुळे शेतकरी सुखावला
अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यात खासगी साखर कारखान्यामध्ये गतवर्षी गौरी शुगरने तीन हजार १०० रुपये बाजारभाव देऊन इतर कारखान्यांच्या तुलनेत आघाडी घेतली होती.तर यंदाही अद्याप इतर खासगी कारखान्यांनी बाजारभाव जाहीर केला नसताना गौरी कारखान्याने तीन हजार २०० रुपये बाजारभाव जाहीर करून बाजी मारल्यामुळे शेतकरी सुखावला आहे..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.