नीरा नरसिंहपूर, ता. १७ : शेवग्याच्या शेंगांचा तुटवडा मागील काही दिवसांपासून निर्माण झाला आहे. शेवग्याचा बाजारभाव गगनाला भिडले असून लिलावात १८० ते २२० रुपये किलो तर किरकोळ बाजारात ३०० ते ४०० रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर शेवगा खाणे गेले आहे.
बाजारात शेवग्याच्या शेंगांना दोनशे वीस रुपये घाऊक दर मिळत असून, किरकोळ बाजारात पन्नास रुपयात केवळ दोन ते तीन शेंगा मिळत आहेत. किरकोळ बाजारातील शेवग्याचा भाव वधारल्याने शेवगा उत्पादकांना सुगीचे दिवस आले आहेत. डिसेंबर महिन्याअखेरीस होलसेल मार्केटमध्ये शेवग्याच्या शेंगांचा बाजारभाव २०० ते ३०० रुपये किलोपर्यंत पोहोचला होता.
जानेवारीत शेवग्याची आवक कमी असल्याने दर कमी झाले असले तरी सफरचंद १६० रुपयापर्यंत बाजारभाव मिळत असताना शेवग्याच्या शेंगांना मात्र १८० ते २२० रुपये प्रतिकिलो इतका दर मिळत आहे.
मागील काही वर्षाच्या तुलनेत पहिल्यांदाच शेवग्याच्या शेंगांचा भाव वधारला आहे. शेतकऱ्यांकडे शेवग्याच्या शेंगांचा तुटवडा जाणवत असूनही बाजारात शेवग्याच्या शेंगांचे प्रमाण खूप कमी प्रमाणात आहे. त्यामुळे विक्रेत्यांना शेवग्याच्या शेंगा चढ्या दराने विकाव्या लागत आहेत. तुटवड्यामुळे शेवग्याच्या तीन शेंगांची विक्री चाळीस ते पन्नास रुपयांना करावी लागते.
- सोहेल तांबोळी, व्यापारी,