ओतूर, ता. २८ ः डिंगोरे (ता. जुन्नर) येथील ग्रामविकास मंडळ, ओतूर संचलित पुष्पावती विद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद माळवे यांनी दिली. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो
या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी वाढावी, ती वाचावी, बोलावी व समजून घ्यावी, या उद्देशाने विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत प्रभावी वक्तृत्व सादर केले.
मराठी भाषा दिनानिमित्त शाहीर दत्ता म्हात्रे यांच्या लोकसंगीतावर आधारित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी त्यांनी पोवाडा तसेच मराठी लोकसंगीताच्या विविध प्रकारांची माहिती देत लोकपरंपरेचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. दत्ता डोंगरे उपस्थित होते.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारे ‘मायबोली’ गीत सादर केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मराठी भाषेबाबत आपली मते व मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख मंगेश कोंढार व दत्तात्रेय घोलप यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी संयोजनासाठी किसन भुतांबरे, रतिलाल बागुल, दिनेश पाटील, जगन्नाथ गाढवे, मंगेश डुंबरे, अनुराधा नरवडे, साधना तांबे व शिवाजी उकिर्डे यांनी परिश्रम घेतले.