पाबळ, ता. १८ : कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील फलकेवाडी शिवारात सोमवारी (ता.१७) मध्यरात्री बिबट्याने गोठ्यात शिरून एका वासराचा फडशा पाडला.
शेतकरी बाळासाहेब चक्कर यांनी बांधलेल्या गोठ्यात गाय व वासरे बांधलेली होती. रात्री सुमारे अकराच्या दरम्यान बिबट्याने आत प्रवेश करून अचानक हल्ला चढवला. कुत्र्यांच्या सततच्या भुंकण्यामुळे ही घटना निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक नारायण राठोड आणि हनुमंत कारकूड यांनी तत्काळ घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. मात्र परिसरात निर्माण झालेली भीती अद्याप कायम असून, नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. मोठ्या मानवी वस्तीच्या परिसरात बिबट्याची अशी वर्दळ अत्यंत धोकादायक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची आग्रही मागणी केली आहे. वनविभागाकडून मागणी नुसार तत्काळ पिंजरे उपलब्ध करून देण्यात येत नसून अनेकदा पिंजरे उपलब्ध नाही, पिंजरे आणण्यासाठी वाहन नाही, वाहन घेऊन या आणि तुम्ही पिंजरा घेऊन जा, अशी उत्तरे दिली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे
सध्या बिबट्यांची दहशत वाढत असताना त्यांना पकडण्यासाठीचे पिंजरे अत्यल्प आहेत. वनविभागाचे कर्मचारी कमी असल्याने एका वनरक्षकाकडे १० ते १५ गावे आहेत. त्यामुळे कामकाजावर मर्यादा येत आहेत. बिबट प्रवण क्षेत्रात वन कर्मचारी वाढविणे आवश्यक आहे. एका ठिकाणी एक बिबट्या पिंजऱ्यात सापडला तरी काही अंतरावर दुसरा बिबट्या मनुष्यांवर व पशुधनांवर हल्ला करीत आहे. या वाढत्या संकटाचा प्रभावी तोडगा काढणे अत्यंत गरजेचे असल्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.