पुणे, ता. १३ : पुणे जिल्हा परिषदेमध्ये ७५ सदस्य निवडून जाणार की ७३, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर शासनाकडून पुण्यामध्ये ७३ जिल्हा परिषद सदस्य आणि १४६ पंचायत समिती सदस्य असतील, यावर शिक्कामोर्तब केले. समाविष्ट गावांमुळे एकूण दोन गट, तर चार गण कमी झाले आहेत. महानगरपालिकेत २३ गावे समाविष्ट झाल्याने हवेली तालुक्यातील सात गट कमी झाले आहेत. नवीन गट संख्येनुसार जुन्नर, खेड, भोर, दौंड आणि इंदापूर तालुक्यात प्रत्येकी एक गटाची वाढ झाली आहे. नवीन गटरचनेप्रमाणे आता हवेलीमध्ये केवळ सहा गट असतील. सन २०१७ मध्ये ही संख्या १३ एवढी होती.
रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट, गण रचना करण्याची अधिसूचना ग्रामविकास विभागाकडून गुरुवारी (ता. १२) रात्री उशिरा काढण्यात आली. जिल्हा परिषदेच्या निवडणुका डिसेंबरपर्यंत पुढे जातील, अशी चर्चा सुरू असतानाच अगोदर महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषद, पंचायत समितींबाबत शासनाकडून अधिसूचना काढण्यात आली.
दरम्यान, ७३ गट आणि पंचायत समितींचे १४६ गण निश्चित करताना लोकसंख्येची सरासरी काढून गट, गणांची निश्चिती करण्यात आली आहे. ज्या तालुक्यांमध्ये गट, गण वाढले किंवा कमी झाले त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गट, गण रचनेत बदल होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. लवकरच नोडल अधिकारांची नेमणूक केली जाईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अहिल्यानगरची सदस्य संख्या सर्वाधिक
समाविष्ट गावांमळे जवळपास अडीच लाख लोकसंख्या पुणे महानगरपालिकेत गेली. परिणामी ग्रामीण भागातील लोकसंख्या घटली. आता अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे सदस्य राज्यात सर्वाधिक असतील. अहिल्यानगरची गटसंख्या ७५ आहे. यापूर्वी पुणे आणि अहिल्यानगर या दोन्ही जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या ७५ एवढी होती.
अखेर गट, गण संख्या निश्चित झाली...
राज्य सरकारकडून २०२२ मध्ये निवडणुका घेण्यासाठी तयारी सुरू केली होती. त्यावेळी सर्व जिल्हा परिषदांचे गट आणि पंचायत समितींचे गण वाढविण्याचा निर्णय घेतला होता. लोकसंख्येच्या प्रमाणात गट आणि गण वाढविले होते. त्यावेळी पुण्यातील गटांची संख्या ७५वरून ८२, तर गणांची संख्या १५०वरून १६४वर झाली होती. मात्र, पुन्हा ही संख्या घटवून २०१७ च्या रचनेनुसार कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. मग त्यामध्ये लोकसंख्या घटल्याने गटांची संख्या ७५हून ७३, तर गणांची संख्या १५०वरून १४६वर आली आहे.
गट, गण वाढलेले तालुके- जुन्नर, खेड, भोर, दौंड, इंदापूर.
गट, गण कमी झालेले तालुके- हवेली
महत्त्वाच्या तारखा
१) प्रारूप प्रभाग (गट, गण) रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करणे– १४ जून
२) जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती, सूचना सादर करणे– २१ जुलै
३) हरकतीच्या आधारे अभिप्रायासह विभागीय आयुक्तांना प्रस्ताव– २८ जुलै
४) हरकती, सूचनांवर सुनावणी घेऊन निर्णय देणे– ११ ऑगस्ट
५) अंतिम प्रभाग (गट, गण) रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे – १८ ऑगस्ट
तालुकानिहाय गट आणि गण संख्या (कंसात २०१७ची संख्या)
तालुका – गट – गण
जुन्नर – ८ (७) – १६ (१४)
आंबेगाव – ५ (५) – १० (१०)
शिरूर – ७ (७) – १४ (१४)
खेड – ८ (७) – १६ (१४)
मावळ – ५ (५) – १० (१०)
मुळशी – ३ (३) – ६ (६)
हवेली – ६ (१३) – १२ (२६)
दौंड – ७ (६) – १४ (१२)
पुरंदर – ४ (४) – ८ (८)
वेल्हे – २ (२) – ४ (४)
भोर – ४ (३) – ८ (६)
बारामती ६ (६) – १२ (१२)
इंदापूर – ८ (७) – १६ (१४)
एकूण – ७३ (७५) – १४६ (१५०)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.