फुलवडे, ता. २३ : जुन्नरमध्ये मानव-बिबट संघर्ष शिगेला पोहोचत असताना शासनाची आर्थिक उदासीनता ठळकपणे समोर आली आहे. पिंजऱ्यांची हलवाहलव, भक्ष्याची खरेदी आणि गस्तीच्या वाहनाचे इंधन ही सर्व अत्यावश्यक कामे वनरक्षक-वनपालांच्या स्वखर्चातूनच पार पडत आहेत. आज अखेर कर्मचाऱ्यांचे ओतूर, शिरूर, मंचर, खेड, घोडेगाव, जुन्नर, चाकण या वन परिक्षेत्रातील वनरक्षक-वनपाल यांचे २५ लाखांपेक्षा अधिक बिले प्रलंबित आहेत. २०२३ पासूनचे थकीत देयकांचे ढिगारे हाललेले नाहीत. संघर्ष तीव्र होत असतानाच निधीअभावी विभागाची कामे अडथळ्यात सापडली आहेत. दरम्यान,२०२३ पासून ची थकीत रक्कम काही प्रमाणात मागील महिन्यात प्राप्त झाली आहे. तरी अनुदान उपलब्ध न झाल्यास स्वखर्चाने कोणतेही काम न करता कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेने दिला आहे.
साधारणतः २४ ते २५ वर्षांपासून जुन्नर वनविभागामध्ये मानव-बिबट संघर्ष सुरू आहे. या संघर्षाचा आलेख उंचावत असून अलीकडील काही दिवसांमध्ये हा संघर्ष शिगेला पोहोचला आहे. या संघर्षामध्ये हजारो पशुधनाचे नुकसान झालेले असून काही लोकांना आपल्या जिवाला मुकावे लागले आहे. जुन्नर वनविभागातील उपवनसंरक्षक, साहाय्यक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक व वनमजूर यांनी लोकप्रतिनिधी व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ही समस्या सोडविण्याचा भरपूर प्रयत्न केलेला आहे. परंतु ज्याप्रमाणे लोकांचा मानव- बिबट संघर्षामध्ये उद्रेक वाढताना दिसत आहे. त्याप्रमाणे वनरक्षक व वनपाल व एकंदरीतच वनविभागाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्या
वनरक्षक व वनपाल यांच्या सुरक्षेची हमी
स्वतंत्र मानक कार्यपद्धती तयार करावी
बिबट प्रश्न हाताळणे करिता नियमित आर्थिक तरतूद करणे
वनरक्षक व वनपाल यांना प्रोत्साहन भत्ता
पोलिसांप्रमाणे कॅशलेस मेडिक्लेम देणे
सुरक्षेकरिता आवश्यक साहित्य पुरवठा करणे
पिंजरे लावण्याकरिता लेखी आदेश मिळणे
मानव-बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ वनाधिकारी यांनी क्षेत्रीय वनकर्मचारी यांच्या समस्या व त्यावरील उपाय याबाबत एकत्रित सभा आयोजित करून वनकर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावेल यासाठी प्रयत्न करावेत
वनविभागाची रचना
वनविभागाची रचना वनक्षेत्रावर अवलंबून असते.
साधारणतः ५०० ते ८०० हेक्टर क्षेत्राकरिता १ नियतक्षेत्र
एका नियतक्षेत्राकरिता एका वनरक्षकाची नियुक्ती. २ ते ५ नियतक्षेत्रांचा १ वनपरिमंडळ तयार होते
एका वनपरिमंडळासाठी १ वनपाल/वनपरिमंडळ अधिकाऱ्याची नियुक्ती
३ ते ७ वनपरिमंडळ मिळून एक वनपरिक्षेत्र तयार होते
क्षेत्रीय कर्मचारी यांना वनक्षेत्रातील वनसंरक्षण व वनसंवर्धन ही कामे सांभाळून मानव-बिबट संघर्ष हाताळावा लागतो
संख्या
वनरक्षक व वनपाल : १३९
वनमजूर : ५८
सध्या जुन्नर वनविभागातील मानव-बिबट संघर्ष हा वनक्षेत्रामध्ये नसून महसुली क्षेत्रामध्ये सुरू आहे. याकरिता महसुली क्षेत्रातील व्याप पाहता जुन्नर वनविभागातील नियतक्षेत्रांची नव्याने पुनर्रचना होणे आवश्यक आहे. त्याकरिता अतिरिक्त पदे निर्माण करणे आवश्यक आहे. प्रत्येक रेंजनिहाय टास्क फोर्सची निर्मिती करणे आवश्यक आहे.
- सी. ए. नलावडे, अध्यक्ष, फॉरेस्टर्स अँड फॉरेस्ट गार्ड असोसिएशन, ठाणा, शाखा-जुन्नर वनविभाग
(वनपाल, भीमाशंकर अभयारण्य -१).
संबंधित संघटनेशी चर्चा करून यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. संघटनेच्या मागण्यांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
- प्रशांत खाडे, उपवनसंरक्षक, जुन्नर वनविभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.