पिंपळवंडी, ता.१२ : खिरेश्वर (ता.जुन्नर) हद्दीतील काळू धबधब्याच्या मुख्य प्रवाहात अडकलेल्या पर्यटकाला स्थानिकांस इतर पर्यटकांना वाचविण्यात यश आले. ही घटना शनिवारी (ता.११)दुपारी तीनच्या दरम्यान घडली. काळू धबधबा हा पाच टप्प्यात खोल दरीत कोसळत असतो. त्याच्या पहिल्या टप्प्याच्या ठिकाणी एक पर्यटक हा पाय घसरून पडल्याचे स्थानिकांनी सांगितले.
खाली शेकडो फूट खोल दरी व काळू नदीच्या अतिवेगवान पाण्याच्या प्रवाहात हा युवक अडकला असता. तेथे असलेल्या पर्यटकांनी त्याला दोरीच्या सहाय्याने बाहेर काढले.वाचवणाऱ्या युवकांनी स्कार्फ,ओढणीच्या माध्यमातून दोरी तयार केली होती. जर या पर्यटकाला वाचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नसते तर त्याचा खोल दरीत पडून मृत्यू झाला असता. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय याठिकाणी आला.सदर व्यक्ती हा पुणे येथून हैद्राबादच्या पर्यटकांना घेऊन आला असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्याला वाचविणारे तरुण हे अहिल्यानगर जिल्ह्यातील संतोष जाधव, उमेश रासकर, श्रीकांत आबाळे, संदीप गोरे तसेच स्थानिक तुषार मेमाणे, संदीप साबळे, नीलेश पाचपिंड हे होते.
स्थानिक तुषार मेमाणे यांनी सांगितले की, पर्यटक हा काळू नदीचा प्रवाह पार करत असताना पाय घसरून पाण्यात पडला तसेच पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जात दरीच्या कडेला अडकला.त्याला वाचविण्यासाठी आम्ही प्रयत्न केले.त्यांच्या सोबत कोणीही गाईड नव्हता. संतोष जाधव यांनी सांगितले की, हा तरुण हुल्लडबाजी करत असताना पाण्याच्या प्रवाहात पडला. त्याला वाचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना आमच्याकडे कोणतीही दोरी उपलब्ध नव्हती त्याचवेळी आमच्या सोबत असलेल्या वेदांत आबाळे यांनी ओढणी व स्कार्फच्या सहायाने दोरी तयार केली व त्याला त्या दोरीच्या माध्यमातून आम्ही वाचवू शकलो. नियमांचे पालन न करणाऱ्या बेशिस्त पर्यटकांमुळेचे पर्यटनाला गालबोट लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, काळू धबधबा ज्याठिकाणी कोसळतो त्याठिकाणी देखील पर्यटकांची गर्दी वाढत चाललेली आहे. धबधब्यात पडून मृत्यू देखील झालेले आहेत. सकाळच्या माध्यमातून आपण या पूर्वी देखील येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने रेलिंग लावणे गरजेचे असल्याचे सांगितले होते. याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.
02532