विकास हवा पण सह्याद्रीत नको...
मावळ तालुक्यात विकासाची गंगा वाहत आहे. रस्ते, पूल, इमारती वेगवेगळे प्रकल्प होत आहेत. ही तालुक्यासाठी आनंदाची बाब आहे. परंतु हा विकास होत असताना आपल्याला लाभलेला सह्याद्रीही टिकवता आला पाहिजे. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उत्खनन, अतिक्रमणे, वृक्षतोड, बेकायदेशीर बांधकामे झाली आहेत आणि सुरूही आहेत. पर्यावरणप्रेमी नागरिक, संस्था-संघटना यांनी जागरुकता दाखवून त्याविरुद्ध पुढाकार घेतला पाहिजे. शासनानेही निष्क्रिय न राहता सह्याद्रीची लचकेतोड थांबविण्यासाठी कारवाईचे पाऊल उचलणे आता गरजेचे बनले आहे.
------------------------------
मावळ तालुक्याची निसर्गसंपन्न म्हणून ओळख आहे. सह्याद्रीच्या रांगा तालुक्याची ओळख वाढवतात. पर्यटकांना फिरण्याचा, निसर्गाचा अन गिरीभ्रमंतीचा आनंद देतात. हजारो पक्षी, वन्यप्राणी, सरीसृपांचे आनंदवन असलेला मावळ तालुका हा अनेक पर्यटनस्थळांचे केंद्र म्हणून परिचित आहे. पुणे - मुंबई जुना महामार्ग, पुणे- मुंबई दृतगती महामार्ग, मध्य रेल्वे मार्ग हे सर्व मार्ग याच तालुक्यामधून जातात. लोणावळा- खंडाळा सारखे थंड हवेचे ठिकाण, सह्याद्रीच्या विस्तीर्ण रांगा, बाजूलाच पवना धरण यामुळे या भागात जमिनीला सोन्याचे भाव आहे. सर्व सुख-सुविधेने परिपूर्ण असल्याने अनेक धनदांडग्या लोकांनी आधीच जमिनी खरेदी करून ठेवल्या आहेत आणि सध्याही जमिनींचे खरेदी- विक्री व्यवहार मोठ्या जोमाने चालू आहेत.
सह्याद्रीची लचकेतोड
सध्या मावळ भागातील डोंगरभागाकडे पाहिले; तर डोंगरभागात अनेकजणांचे टोलेजंग बंगले झाले आहेत. अनेकजण डोंगरांचे पायथे लाल माती आणि मुरूमसाठी पोखरत आहेत. काहीजण बेकायदेशीररित्या प्लॉटिंग करून जमीन विक्री करत आहेत. डोंगरभागाची लचकेतोड मोठ्या प्रमाणात चालू असलेली पाहावयास मिळत आहे. खासगी वनीकारण असलेल्या जमिनी खासगी होत आहेत. डोंगरभागात रस्ते होत आहेत. वन्यप्राण्यांचा अधिवास नष्ट होत आहे. शिकाऱ्यांचे वाढते प्रमाण आहे. वन्यप्राणी संख्या दिवसेंदिवस घटू लागली आहे. खरे सांगायचं झाले; तर वन्यप्राणी आता दिसेनासे झाले आहेत.
प्राणी-पक्ष्यांवर दुष्परिणाम
मावळ परिसरात डोंगरभाग असो किंवा त्यावरील विस्तृत पठार. खासगी वनीकारण असो किंवा वनक्षेत्र त्यामध्ये हजारो हेक्टरवर सह्याद्रीचे जाळे पसरलेले आहे. शेकडो झाडे, वनस्पती, सरीसृप, विविध प्रकारचे पक्षी, किटके यांचा हा अधिवास. मात्र, पशु- पक्षांचा अधिवास असणारे डोंगरभाग मावळ भागातून नष्ट होत आहे, असे सध्या दिसतेय. मावळातील डोंगररांगांवर विविध प्रकारचे प्रकल्प होताना दिसत आहेत. एकीकडे तालुक्याचा विकास होतोय; तर दुसरीकडे जंगले नष्ट होत आहेत आणि त्यांचा दुष्परिणाम थेट प्राणी-पक्षांवर होत आहे. पवनचक्की प्रकल्प हा वीजनिर्मितीसाठी शासनाच्या उपयोगासाठी प्रकल्प असेल. मात्र, त्याचा दुष्परिणाम थेट मुक्या पशु- प्राण्यांच्या अधिवासावर झाला. त्यांचा अधिवास नष्ट झालाच आहे. परंतु पवनचक्कीसाठी असणाऱ्या रस्त्याचाही उपयोग शिकारी वन्यप्राणी हत्येसाठी करू लागले आहेत आणि उरले-सुरलेले वन्यप्राणीही शिकाऱ्यांकडून फस्त होत आहेत.
वन्यप्राणी नष्ट होण्याची भीती
तालुक्यातील डोंगरभागातील अनेक ठिकाणी धनदांडग्यानी टोलेजंग बंगले बांधण्यासाठी तसेच हॉटेल्स व रेस्टॉरंटसाठी डोंगरभाग पोखरले आहेत. त्यात काही जागा खासगी असतील, काही खासगी वनीकरण किंवा काही जागेत अतिक्रमणेही असण्याची दाट शक्यता आहे. सांबर, भेकर, बिबट्या, विविध जातीची रानमांजरे, साप, रानडुक्कर, कोल्हे, तरस, रानससे आणि जगातील सर्वात लहान हरणाची जात म्हणजेच ‘माउस डियर’ हाही प्राणी सह्याद्री भागात आढळतो. मावळातील डोंगरभागाची ही लचकेतोड आणि त्यावरील बांधकामे अशीच चालू राहिली; तर सह्याद्रीतील हा मानवाचा हस्तक्षेप प्राण्यांच्या जीव घेत राहील. त्यामुळे भविष्यात निसर्गसंपन्न मावळ तालुक्याची ओळख संपुष्टात येईल, असेच म्हणावे लागेल.
कायदे, नियम पायदळी
दुर्मिळ प्राणी, पक्षी, झाडे, वनऔषधी व जंगल अशी जैवविविधता असलेले क्षेत्र म्हणजे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र (इको
सेन्सिटिव्ह झोन). पर्यावरणाचा समतोल टिकवण्यासाठी त्याचे जतन आवश्यक असते. त्यासाठी काही नियम ठरवले जातात. जैवविविधता असलेले हे क्षेत्र सुरक्षित राहावे म्हणून शासनाने हे क्षेत्र तयार केले. त्यासाठी नाणे, पवन व आंदर मावळातील ५१ गावांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला. मात्र, याठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन, अतिक्रमणे, वृक्षतोड, बेकायदेशीर बांधकामे सुरू आहेत व झाली आहेत. याकडे महसूल, वन विभाग व बांधकाम विभाग का दुर्लक्ष करतंय? असा प्रश्न निर्माण होत आहे. पर्यावरणप्रेमी नागरिक, संस्था-संघटना यांनी जागरुकता दाखवून त्याविरुद्ध पुढाकार घेतला पाहिजे. महसूल, वन विभाग व बांधकाम विभागांनीही निष्क्रियता सोडून सह्याद्रीची लचकेतोड थांबविण्यासाठी थेट कारवाईचे पाऊल उचलणे गरजेचे बनले आहे.
त्याने केवळ सह्याद्रीचीच हानी होणे थांबणार नाही; तर वन्यप्राणी, पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवासाबरोबरच भावी पिढ्यांचीही पर्यावरणदृष्ट्या हानी होणे टाळणे शक्य होईल.
- दक्ष काटकर, नाणोली तर्फे नाणे