राहुल हातोले ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २४ : एप्रिल व मे महिन्यात पिंपरी-चिंचवड परिसरातील उष्णतेचा पारा चढलेला असताना शहरवासीयांनी दिलासा म्हणून मेट्रोच्या शीतल वातानुकूलित प्रवासाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतल्याचे चित्र दिसून आले. पुणे महामेट्रोने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात तब्बल २० लाख ४१ हजार प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला असून, फेब्रुवारी व मार्चच्या तुलनेत प्रवासी संख्येत एक लाखाहून अधिक प्रवाशांची वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
उन्हाळ्यात मेट्रोची पसंती
पिंपरी-चिंचवड शहरातील तापमान एप्रिल महिन्यात ४० अंशांच्या आसपास गेले होते. रस्त्यावरील प्रदूषण, गर्दी व उष्णता टाळण्यासाठी नागरिकांनी मेट्रोचा आधार घेतल्याचे स्पष्ट दिसते. विशेषतः वातानुकूलित डब्यांमुळे नागरिकांना आरामदायी व सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळाला.
आकडे बोलतात
......................................................................
फेब्रृवारी : मार्च : एप्रिल
....................................................................
प्रवासी : १८,५९,५५८ : १९,४६,१७९ : २०,४०,९२९
.....................................................................
उत्पन्न : ३,०१,७२,७९२ : ३,१६,६६,५३६ : ३,४१,२०,१९१
........................................................................
मेट्रोच्या प्रवासात बदलते शहर
पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो सेवा सुरू होऊन आता तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. सुरुवातीस पिंपरी ते फुगेवाडी दरम्यान सेवा सुरू झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील मार्ग खुले झाले.
मेट्रो सेवा विस्ताराची टप्प्याटप्प्याची वाटचाल
- ६ मार्च २०२२ : पिंपरी ते फुगेवाडी सेवा सुरू
- १ ऑगस्ट २०२३ : पिंपरी ते सिव्हिल कोर्ट दरम्यान सेवा सुरू
- २९ सप्टेंबर २०२४ : पिंपरी ते स्वारगेट दरम्यान सेवा कार्यरत
प्रवाशांत वाढ
- शाळा व महाविद्यालयांना उन्हाळी सुट्ट्या असतानाही एप्रिल महिन्यात उष्णतेमुळे अपेक्षित घट झाली नाही, उलट वाढच झाली
- शहरात राहणाऱ्या नागरिकांनी कार्यालयीन कामासाठी व दैनंदिन प्रवासासाठी मेट्रोचा वापर अधिक
- खासगी वाहनांचा वापर टाळत मेट्रोच्या वातानुकूलित वातावरणाचा घेतला आधार
- प्रवाशांचा कल पर्यावरणपूरक व आरामदायी पर्यायांकडे वळल्याचे संकेत
मेट्रोच्या यशाकडे
- शहराची वाढती गरज पूर्ण करणारी सेवा
- वातानुकूलित प्रवासामुळे दिलासा
- गर्दी, प्रदूषण आणि वाहतूक कोंडीतून सुटका
- महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न
पर्यावरणपूरक आणि प्रवाशांच्या सोईसाठी मेट्रो सुविधा सुरू केली आहे. यामुळे सार्वजनिक व्यवस्था सक्षम होत आहे. पीएमपीएमएल व ॲटोरिक्षा यांची फिडर सेवा सुरू केल्याने प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.
- सुजित कानडे, वरिष्ठ उपमहाप्रबंधक, जनसंपर्क, महामेट्रो
पुण्यामध्ये कार्यालय असल्याने निगडी ते पुणे असा प्रवास पीएमपीने करीत आहे. मात्र, उन्हाचा कहर वाढल्याने मेट्रोनेच प्रवास केला. पिंपरीपर्यंत फिडर सेवेचा वापर करून आता मेट्रोने प्रवास करीत आहे.
- शैलेश शिंदे, प्रवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.