पुणे, ता. ७ : भोर तालुक्यातील शिंदेवाडी ग्रामपंचायतीने राबविलेला नावीन्यपूर्ण ‘सात सेवा ऑनलाइन’ हा डिजिटल उपक्रम आता जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी आदर्श ठरत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना ग्रामपंचायतीकडून मिळणारे सात महत्त्वाचे दाखले आता केवळ एका क्लिकवर, थेट त्यांच्या मोबाइलवर डाऊनलोड करता येणार आहेत.
शिंदेवाडी ग्रामपंचायतीने सुरवातीला केवळ कर भरण्याची प्रक्रिया डिजिटल केली होती. परंतु टप्प्याटप्याने सुधारणा करत या प्रणालीमध्ये दाखला वितरणाची सुविधाही जोडण्यात आली. आता ग्रामपंचायतीच्या प्रत्येक घरावर एक विशेष क्यूआर कोड लावण्यात आला आहे. नागरिकांनी हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर थेट ग्रामपंचायतीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाता येते. तेथे आवश्यक दाखला निवडून अर्ज केल्यानंतर संबंधित माहितीची पडताळणी झाल्यावर प्रमाणपत्र पीडीएफ स्वरूपात तत्काळ मोबाईलवर उपलब्ध होते. त्यामुळे नागरिकांना ग्रामपंचायतीत फेऱ्या मारण्याची गरज राहिलेली नाही. तसेच प्रशासनाची पारदर्शकता आणि गती दोन्ही वाढली आहे.
याबाबत सर्वात पहिल्यांदा हा प्रयोग राबविलेले ग्रामसेवक नवनाथ झोळ म्हणाले, ‘‘आम्ही सुरवातीला केवळ कर संकलनासाठी हा उपक्रम सुरू केला होता. मात्र, आता त्यात अनेक बदल केले. सुरक्षिततेवर देखील विशेष लक्ष दिले आहे. आता भोर तालुक्यातच सर्वाधिक ८० टक्के ग्रामपंचायतीमध्ये काम पूर्ण झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदेवाडीत सुरू केलेला हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविला जात असल्याचा आम्हाला आनंद आहे.’’
शिंदेवाडीने काय केले
पूर्वी जुन्या वाड्याच्या चौकटीवर धातूची पट्टीवर घराची माहिती होती. त्याऐवजी शिंदेवाडीत डिजिटल पाटी तयार करण्याचे ठरवण्यात आले. सर्व माहिती भरणे अवघड असल्याने एका खासगी कंपनीशी चर्चा केली. त्यानंतर घरातील पती, पत्नीचे नाव, घर क्रमांक आणि क्यूआर कोड असलेली पाटी तयार केली. पाटीचा आकार लहान ठेवण्यात आला आणि तो क्यूआर कोड प्रत्येक घरावर लावण्यात आला. त्याद्वारे मिळकत कर संकलनाची प्रक्रिया डिजिटल करण्यात आली.
जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायती- १,३९४
अंमलबजावणी झालेल्या ग्रामपंचायती- ४५७
हे दाखले मिळणार- जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, दारिद्र्य रेषेखालील दाखला, ग्रामपंचायत थकबाकी नसल्याचा दाखला, वृद्धापकाळ किंवा निराधार असल्याचा दाखला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून सध्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सात सेवा ऑनलाइन करण्यावर आमचा भर आहे. या अभियान कालावधीत सर्व ग्रामपंचायतीमध्ये ही सेवा सुरू करण्याचा आमचा मानस आहे. त्यादृष्टीने सूचनाही देण्यात आल्या आहेत. शिंदेवाडी गावाने ज्या पद्धतीने ऑनलाइन सेवा सुरू केल्या, तोच पॅटर्न घेऊन पूर्ण जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- भूषण जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद