पिंपरी, ता. २६ ः पिंपरी चिंचवड शहरात संविधान दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालयांमध्ये आण संस्था- संघटनांनी पथनाट्य, भाषणे, निबंध लेखन आणि प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आल्या. अनेक ठिकाणी संविधान रॅली काढण्यात आली. काव्य आणि गीतांमधून संविधानाचा जागर करण्यात आला. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाच्या जय जयकाराने शाळेचा परिसर दणाणून गेला होता. ‘जय संविधान,’ ‘देशभर एकच नाव - संविधान संविधान,’ ‘लोकशाहीचा जागर, संविधानाचा आदर’, अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते.
टागोर शिक्षण संस्था
इंद्रायणी नगर येथील टागोर शिक्षण संस्थेत संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब मगर, बँकेचे अध्यक्ष नंदकुमार लांडे पाटील, उपाध्यक्ष महेश घावटे, सचिव सुरेश फलके तसेच सूरज लांडे-पाटील, मुख्याध्यापक उद्धव ढोले, संतोष काळे यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात प्रभातफेरीने झाली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व संविधान पुस्तिकेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ शिक्षक बी. टी. साळुंखे, शिवाजी गुरव, माया पाटोळे, शरद तोरणे उपस्थित होते. या वेळी ऋतुजा मोहरे आणि रोहण शेगोकार यांनी मनोगत व्यक्त करून संविधानाचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी ‘आमचे हक्क व कर्तव्य’ या विषयावर पथनाट्य सादर केले. पथनाट्यात प्रणिती काळे, पार्श आलम, ऋषिकेश वाजे, अदिती नागरे आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
श्रीमती कोंडाबाई गोलांडे विद्यालय
चिंचवड येथे कै. श्रीमती कोंडाबाई गोलांडे प्राथमिक विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा उज्ज्वला चौधरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. चौधरी यांनी संविधानाचे महत्त्व स्पष्ट केले. विद्या सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले.
संघवी केशरी महाविद्यालय
संघवी केशरी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन व संविधानाचे महत्त्व या संदर्भात उपक्रम घेण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. धीरज शाखापुरे यांनी ‘संविधान हे आपली ओळख आहे. संविधान माणसाला प्रतिष्ठा देते. सर्व धर्मग्रंथापेक्षा संविधान हे श्रेष्ठ आहे,’ असे सांगितले. याप्रसंगी प्रा. प्रवीण जावीर, डॉ. सचिन ओहोळ, प्रा. अविनाश कदम, प्रा. तुकाराम सोळंके, प्रा. अभिषेक आकणकर, अंकुश मोरे, तुकाराम ढेंगळे उपस्थित होते. डॉ. संतोष काशिद यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. नितीन जाबरे यांनी आभार मानले.
एच. ए. प्रशाला
पिंपरी येथील एच. ए. स्कूल माध्यमिक विभागात संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान जागरूकता कार्यक्रम घेतला. पुणे जिल्हा परिषदेचे वित्त व लेखा अधिकारी संजय धीवर उपस्थित होते. शिक्षक जितेंद्र बोडरे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात असलेले न्याय, स्वातंत्र्य व समता या मूल्यांचे महत्त्व उलगडून सांगितले. विद्यार्थिनी प्राजक्ता सिंदाळकर हिने संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. विविध विषयांवर प्रशालेतील १२०० विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा घेण्यात आली. उपमुख्याध्यापिका आशा माने, मनीषा कदम, विजया तरटे उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका दर्शना कोरके यांनी प्रास्ताविक केले. शिल्पा राशीनकर यांनी सूत्रसंचालन केले.
राहुल मित्र मंडळ ट्रस्ट
पिंपळे निलख येथील राहुल मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने मुख्य बस स्थानक येथे महिलांनी संविधानाच्या प्रत हातात घेऊन ‘संविधान दिन’ साजरा केला. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप जगताप, उपाध्यक्ष बाळासाहेब कांबळे, ॲड. मनोज ओव्हाळ, सुरेश शिंदे, राहुल वाघमारे, सचिन कांबळे, प्रज्ञा जगताप, अजय नागरे, आनंद वानखेडे, नीलेश जगताप, अमित कांबळे, तन्मय शिंदे, विद्या जगताप आदी उपस्थित होते.
प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय
आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त संविधान दिनाची शपथ घेण्यात आली. २६/११चा शहीद दिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्राचार्य डॉ. अभय खंडागळे, उपप्राचार्य डॉ. मधुकर राठोड, उपप्राचार्य डॉ. अमोल सोनवणे, संजय झेंडे उपस्थित होते. प्रा. अविनाश काळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गंगाधर किटाळे यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाची शपथ दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती
देहूगावात व्हीडीबीए सोशल फाउंडेशन, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती देहूगाव आणि प्रज्ञा बुद्धविहार कमिटी देहूगाव यांच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गौतम बुद्ध व भारतीय संविधान पुस्तक पूजनाने झाली. चौकाचा देखावा फुलांच्या सजावटीने उजळून निघाला होता. त्यानंतर सामूहिक संविधान प्रस्तावना वाचन झाले. या वेळी प्रा. प्रदीप कदम, प्रा. विकास कंद उपस्थित होते. दरम्यान, विद्यार्थ्यांनी संविधान जनजागृतीचे संदेश असलेले फलक हातात घेऊन रॅली काढली.
गीता मंदिर प्राथमिक शाळा
चिंचवडमधील गीता मंदिर प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक महेंद्र भोसले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. तसेच संविधानाच्या प्रतीचे पूजन करण्यात आले. संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी भाषणे, चारोळ्या, समूहगीते, घोषवाक्य सादर केली. सातवीच्या विद्यार्थ्यांनी शालेय कट्ट्यातून संविधानविषयक माहिती देणारी प्रश्नावली सादर केली. सहशिक्षिका शुभांगी कवर यांनी संयोजन केले. विद्यार्थिनी रुंजी कांबळे हिने निवेदन केले. या वेळी ज्योत्स्ना वाव्हळ, मंदा कोकरे, राजश्री गायकवाड, सुनीता धोंडगे, अपर्णा संकपाळ उपस्थित होते.
उर्दू माध्यमिक विद्यालय
उर्दू माध्यमिक विद्यालय रुपीनगर येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. या वेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मुख्याध्यापक आर. पी. कोंढावळे, शिक्षक अशफाक शेख, मोहम्मद फैसल, ताहेरा फातिमा शेख उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून हाफिज जावेद हमजा यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व सांगितले. प्रश्नमंजूषा स्पर्धा, पोस्टर सादरीकरण, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, नाटक सादरीकरण, वृक्षारोपण तसेच संविधानाची प्रस्तावना वाचन उपक्रम राबविण्यात आले. विद्यार्थिनी मुनीबा सिद्दिकी यांनी संविधानाची प्रस्तावना वाचून दाखवली. जनजागृती रॅली काढण्यात आली. उर्दू माध्यमिक विद्यालय विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकसन समिती यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल
श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल व ज्युनिअर महाविद्यालयामध्ये संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे तसेच संविधानाचे पूजन करून आकर्षक रांगोळी काढण्यात आली. संविधान गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य विक्रम काळे यांनी प्रास्ताविक केले. इर्षाद आत्तार यांनी संविधान निर्मितीची माहिती स्पष्ट केली. रामनाथ खेडकर यांनी संविधानाचे वाचन केले. विठ्ठल शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले. अलका बारगजे यांनी आभार मानले.