केडगाव, ता. २ : भक्तिरसात न्हालेल्या आणि टाळमृदंगाच्या गजरात निघालेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी मार्गाला सप्तरंगी रांगोळीने समजविण्याचा भक्तीमय उपक्रम २५ वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. यामुळे रांगोळीच्या माध्यमातून वारीच्या वाटेचे सौंदर्य खुलविले जात आहे. यासाठी खुटबाव (ता.दौंड) येथील जयहिंद प्रतिष्ठान व भैरवनाथ शिक्षण संस्थेने विठूरायाच्या सेवेसाठी हा अनोखा यज्ञ अविरतपणे सुरू ठेवला आहे.
रांगोळी काढण्याच्या उपक्रमाचा यंदा रौप्य महोत्सव आहे. उपक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब ढमढेरे आणि सचिव संजय शितोळे, संचालक जी.के. थोरात, संस्थेचे अध्यक्ष कै. पोपटराव थोरात यांच्या प्रेरणेतून झाली. विद्यार्थी, शिक्षक ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता सकाळीच वारीच्या वाटेवर रांगोळीच्या पायघड्या घालायला सुरुवात करतात. रांगोळ्या इतक्या आकर्षक असतात की, डोळ्याचे पारणे फिटते. या रांगोळ्या वारकरी व ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतात. संजय शितोळे यांच्या निधनानंतरही त्यांच्या सहकार्यांनी हा उपक्रम सुरूच ठेवला आहे. तीन दिवस सोहळा दौंड तालुक्यात असतो. या दरम्यान (बोरीभडक ते उंडवडी) ही रांगोळी काढण्याची सेवा केली जाते. या उपक्रमाचा खर्च भैरवनाथ शिक्षण संस्था करत असते.
रांगोळीतून उमटतात भक्तीचे रंग
रांगोळी उपक्रमाचे सूत्रसंचालन आणि कलासंयोजन सुभाष फासगे हे गेल्या २५ वर्षांपासून अत्यंत समर्पित भावनेने करीत आहेत. वारीच्या वाटेवर विद्यार्थिनी रांगोळीचे धडे गिरवत असतात. या रांगोळ्या म्हणजे जणू भक्तीची रंगीत छाया असते. यंदा या उपक्रमात चौफुला (ता.दौंड) येथील मा. काकासाहेब थोरात विद्यालयाच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
वारकऱ्यांची सेवा करणे, त्यांच्या वाटेला सुशोभित करणे, आनंदात रंग भरणे ही आमच्यासाठी पूजा आहे. भैरवनाथ विद्यालयाच्या विद्यार्थिनी वारीच्या वाटेवर रंगांची आरास उभी करतात. या सेवेतून मनस्वी आनंद मिळतो.
- सुभाष फासगे, कलाशिक्षक
सामूहिक भावनेचा उत्सव
माउलींच्या सेवेसाठी आमचा एक छोटासा हातभार. हा या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाच्या भाव असतो. या सामूहिक भावनेमुळे हा उपक्रम केवळ एक कलाविष्कार न राहता, तो भक्तीचा उत्सव बनतो.
- भाऊसाहेब ढमढेरे, अध्यक्ष, जयहिंद प्रतिष्ठान
चौफुला (ता.दौंड) : संत तुकाराम पालखी सोहळ्याच्या वाटेवर रांगोळीसह विद्यार्थी व शिक्षक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.