(प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय)
प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त मराठी भाषा व साहित्य संशोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अभय खंडागळे होते. उपप्राचार्य डॉ. हिरालाल सोनवणे यांनी संशोधन कार्यशाळेनिमित्त मराठी विभागाने नावीन्याचा शोध घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त केल्याबद्दल विभागाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. उपप्राचार्य डॉ. मधुकर राठोड यांनी मराठी विभागाचे कौतुक करून भाषा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असून, भाषेतून आपण आपल्या विचारांना व कृतीला प्रत्यक्षात कसे आणतो याचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या स्वाती महाळंक यांनी मराठी भाषाशास्त्र व साहित्य यांचे संशोधन करणे किती गरजेचे आहे, याचे महत्त्व पटवून दिले. दुसरे वक्ते सहायक दिग्दर्शक रहमान पठाण यांनी मराठी भाषा व चित्रपट या संदर्भात विद्यार्थ्यांशी हितगुज करताना या दोन्ही क्षेत्रांत आपण स्वतःची ओळख वेगळ्या पद्धतीने कशी करू शकतो, हे सांगितले. मराठी विभाग प्रमुख डॉ. महादू बागूल यांनी प्रास्ताविक केले. परिचय डॉ. संगीता लांडगे यांनी करून दिला व सूत्रसंचालन सरिता गांगुर्डे यांनी केले. विजय शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रा. सोनल काटे, डॉ. पंकज शिरसाळे यांनी प्रयत्न केले.
विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ
(श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा कनिष्ठ महाविद्यालय)
श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ उत्साहात पार पडला. प्राचार्य विक्रम काळे यांनी प्रास्ताविक केले. व्यावसायिक विभागातील संघवी केसरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एल. डोंगरे, प्राचार्य डॉ. संजय वालोदे, प्राचार्य डॉ. सचिन फेगडे, प्राचार्य डॉ. अनिल थिटे, प्राचार्य अमर पापळ उपस्थित होते. याप्रसंगी जैन विद्या प्रसारक मंडळातील व्यावसायिक अभ्यासक्रमांची माहिती सर्व प्राचार्यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना दिली व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बारावीची- अक्षदा राऊत, राणी मंजुळे, प्रांजल करे, विजयाराणी सूर्यवंशी. अकरावीची- दीक्षा शिंदे, प्रियंका देवकाते, प्रीती पवार या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. विभाग प्रमुख नीता कटारिया यांनी बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन सविता पवार यांनी केले.
टुरिझम कार्निवलचे उद्घाटन
(जेट इंडिया महाविद्यालय)
आकुर्डी येथे आयआयबीएम संचालित जेट इंडिया महाविद्यालयाच्या वतीने टुरिस्ट-डेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या टुरिझम कार्निवलचे उद्घाटन उत्साहात झाले. महाराष्ट्राला लाभलेला सागरी किनारा, गड-किल्ले, लेण्या, धार्मिक स्थळे अशा सांस्कृतिक वैभवाने नटलेला महाराष्ट्र पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध आहे. विविधतेत एकतेचे उत्तम उदाहरण असलेला हा प्रदेश असूनही अपेक्षित प्रमाणात पर्यटन प्रचार होत नसल्याची खंत महाराष्ट्र पर्यटन विभागाचे उपसंचालक भरत लांघी यांनी व्यक्त केली. या वेळी एअर इंडिया एक्सप्रेस, पुणे विमानतळाचे स्टेशन व्यवस्थापक सनी चोपडा, एथिकल ट्रॅव्हल प्रोफेशनल्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षा श्वेता उंडरे, ट्रॅव्हल एजन्सीज असोसिएशन पुण्याचे अध्यक्ष नीलेश भन्साळी तसेच जेट इंडिया महाविद्यालयाच्या संचालिका शिरीन वस्तानी उपस्थित होत्या. केंब्रिज ग्रुप ऑफ स्कूल्सचे अध्यक्ष धनंजय वर्णेकर यांचेही सहकार्य लाभले. या कार्निवलमध्ये ३५ विविध देशांची माहिती, प्रकल्प, पारंपरिक वेशभूषा तसेच खानपान सादर करण्यात आले होते. राज्यभरातून आलेल्या नागरिकांसह शहरातील विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. याशिवाय भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी सांस्कृतिक नृत्ये विद्यार्थ्यांनी सादर करून विविधतेचे दर्शन घडवले. प्रास्ताविक शिरीन वस्तानी यांनी केले.
वाणिज्य सप्ताहात विशेष व्याख्यानाचे आयोजन
(प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय)
प्रा. रामकृष्ण मोरे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये ‘वाणिज्य सप्ताह २०२५-२६’ उत्साहात साजरा केला जात आहे. या निमित्ताने, विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवी दिशा देण्यासाठी ‘बदलते शैक्षणिक धोरण आणि रोजगार’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विजय निकम होते. त्यांनी बदलत्या शैक्षणिक धोरणामुळे रोजगाराच्या कोणत्या नवीन संधी यावर मार्गदर्शन केले. हे व्याख्यान द्वितीय वर्ष वाणिज्यच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. डॉ. अर्चना माळी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुनील लंगडे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन पिंकी शर्मा आणि किरण तिवारी यांनी केले. दरम्यान, देविका दायमा, तृषा विश्वकर्मा, श्रद्धा कनोजिया, भक्ती निंबाळकर या विद्यार्थिनींनी नाटिका सादर केली. वाणिज्य विभाग प्रमुख आणि अधिष्ठाता डॉ. पद्मावती इंगोले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी डॉ. अर्चना माळी, प्रा. सुप्रिया बिराजदार आणि प्रा. विजया जाधव यांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.