सोमाटणे, ता. ३ : व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर गुलाबाच्या फुलांना वाढती मागणी आणि चांगले बाजारभाव मिळू लागल्याने, कर्ज काढून उभारलेल्या पॉलिहाऊस व्यवसायातून शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे.
गुलाबाच्या उत्पादनासाठी मावळ तालुक्यातील अनुकूल हवामानामुळे गेल्या अडीच दशकांपासून कॉर्पोरेट कंपन्यांनी व्यापारी स्वरूपात पॉलिहाऊसचे जाळे निर्माण केले होते. शेतीपूरक असलेल्या या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे लक्षात आल्याने पवना, आंद्रा व इंद्रायणी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून पॉलिहाऊस व्यवसाय सुरू केला होता. मात्र सुरुवातीच्या काळात डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि गुलाबाच्या फुलांना मिळणारे कमी बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली होती.
दरम्यान, फूल व्यवसायासाठी शासनाकडून तातडीने ५० टक्क्यांहून अधिक अनुदान मिळाल्याने तसेच व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने गुलाबाच्या फुलांचे बाजारभाव वाढल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उत्पादनासाठी लागणारे बहुतांश श्रम घरातीलच असल्याने मजुरीवरील खर्च वाचत असून, सध्या गुलाब उत्पादनात शेतकऱ्यांनी कार्पोरेट कंपन्यांनाही मागे टाकत आघाडी घेतली आहे. परिणामी, पवनमावळ व आंदरमावळ परिसरात मोठ्या प्रमाणात पॉलिहाऊस उभारण्यात आले आहेत.
सध्या लाल रंगाच्या गुलाबाच्या फुलांना विशेष मागणी असून, स्थानिक बाजारपेठेत एका फुलाला वीस रुपयांहून अधिक दर मिळत आहे. यावर्षी व्हॅलेंटाईन डे अजून दूर असतानाच गुलाबाच्या दरांनी उच्चांक गाठला असून, प्रत्यक्ष व्हॅलेंटाईन डेच्या काळात एका फुलाला किमान चाळीस रुपये दर मिळण्याची शक्यता आहे. वाढत्या बाजारभावामुळे पॉलिहाऊससाठी घेतलेल्या कर्जातून लवकर मुक्तता होईल, असा विश्वास फुल उत्पादक शेतकरी वासुदेव लखीमले यांनी व्यक्त केला. गुलाबाच्या फुलांपासून चांगले उत्पादन मिळत असल्याने तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता पॉलिहाऊस व्यवसायाकडे वळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
PNE26V92337
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.