पिंपरी, ता. ८ : ‘अखाद्य’ बर्फात निळा रंग टाकण्याची अधिसूचना काढून आठ वर्षे होत आले, तरी या निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. शहरातील काही कारखान्यांमधून ‘खाद्य’ आणि ‘अखाद्य’ असे वर्गीकरण न करताच बर्फ विक्रीस पाठवला जात आहे. तरीही, अन्न व औषध प्रशासन कारवाई करत नसल्याची स्थिती आहे. याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त (अन्न) दिगंबर भोगावडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘‘बाहेर आहे,’’ असे सांगत अधिक माहिती देणे टाळले.
मुंबई शहर आणि उपनगरात मे २०१७ मध्ये गॅस्ट्रोने थैमान घातले होते. त्यावेळी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पाहणीत रस्त्यांवरील बर्फाचे ७४ टक्के नमुने दूषित असल्याचे उघड झाले. त्यामुळे दूषित बर्फाला प्रतिबंध म्हणून त्याचा रंगच बदलण्याचा निर्णय अन्न आणि औषध प्रशासनाने त्यावेळी घेतला. औद्योगिक (अखाद्य) बर्फ आणि ‘खाद्य’ बर्फ असे वर्गीकरण करुन खाण्यास अयोग्य असलेल्या म्हणजेच ‘अखाद्य’ बर्फाला निळा रंग देण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनाने मे २०१८ मध्ये बर्फाच्या उत्पादनासंदर्भातील अधिसूचना काढली होती. एक जून २०१८ पासून नव्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाची उघड पायमल्ली करुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असताना अन्न व औषध प्रशासन विभाग गप्प का ? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
निकष आणि वस्तुस्थिती...
- खाद्य बर्फ बनविताना शुद्ध पाण्याचा (मिनरल वॉटर) वापर आवश्यक
- परवानाधारक कारखान्यांवर ‘आरओ’ प्लांट उभारणे बंधनकारक
- बहुतांश कारखान्यांमध्ये बर्फ बनविण्यासाठी कुपनलिका किंवा विहिरीच्या पाण्याचा वापर
- अखाद्य बर्फ बनवताना निळा रंगाचा वापर करण्यास टाळाटाळ
- खाद्य-अखाद्य बर्फ कोणता ? हे ओळखणे अशक्य
महापालिकेचेही दुर्लक्ष
राज्य शासनाकडे नोंदणी असलेले फक्त एकच बर्फ उत्पादन केंद्र पिंपरी चिंचवड शहरात सध्या सुरू असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे. शहरातील रसवंतीगृह चालक, फेरीवाले किंवा रस्त्यावरील थंड पेय विक्रेते कमी किमतीतील बर्फ घेऊन तो थंड पेयामध्ये वापरत आहेत. यामुळे ग्राहकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. मात्र, थंड पेयांमधील बर्फाचे नमुने घेण्याची आणि कारवाईची तसदी ना महापालिकेकडून घेतली जाते, ना अन्न आणि औषध प्रशासनाकडून.
बर्फ दूषित असल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. गॅस्ट्रो, जुलाब यासह अनेक आजारांना सामोरे जाण्याची शक्यता असते. थंड पेय किंवा पदार्थ खाताना नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे.
- राहुल गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, मेडिसिन विभाग, वायसीएम रुग्णालाय