परिंचे, ता. १० : पुरंदर पुरंदर तालुक्यातील कादरी, बहिरवाडी, पानवडी या दुर्गम भागामध्ये तब्बल एक वर्षांनी लाल परीचे दर्शन झाल्यामुळे शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. सासवडवरून पानवडी मार्गे ही सेवा बहिरवाडीपर्यंत सुरू करण्यात आली असून, दिवसातून एकच फेरी करणार असल्याचे सासवड आगार व्यवस्थापक सागर गाडे यांनी सांगितले आहे.
बहिरवाडी गावात एसटी सेवा सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी बसची पूजा व औक्षण करून वाहक व चालकांचा श्रीफळ देऊन सत्कार केला. कोरोना काळातही अशीच सेवा बंद झाली होती, त्यानंतर प्रयत्न करून ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. गेल्या एक वर्षापासून बस संख्या कमी असल्यामुळे, तसेच वाहक व चालक कमी असल्याचे कारण सांगून ही सेवा पुन्हा बंद करण्यात आली होती. या दरम्यानच्या काळात शालेय विद्यार्थ्यांना पाच किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत होती. तसेच, सासवड मुख्य बाजारपेठ असल्याने ग्रामस्थ तसेच आजारी रुग्णांना पायपीट करून काळदरी गावापर्यंत चालत जावे लागत होते.
याबाबत ‘सकाळ’मध्ये वारंवार वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. ग्रामस्थांची मागणी व प्रसिद्ध झालेल्या बातम्यांची दखल घेत आमदार विजय शिवतारे यांनी पानवडीमार्गे बस सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करून ही सेवा सुरू केली. ही बस रोज संध्याकाळी चार वाजता सासवड आगारातून पानवडी मार्गे बहिरवाडीला जाणार आहे. पूर्वी बहिरवाडी गावात मुक्कामी एसटी बस होती, त्याचा फायदा सासवड येथे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, तसेच कामासाठी जाणाऱ्या व्यक्तींना होत होता. त्याच पद्धतीने आमच्या दुर्गम भागाचा विचार करून महामंडळाने मुक्कामी एसटी बस देण्याची मागणी शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमोल भगत, शिक्षक अनिल गळंगे, मोहन वाघमारे, सुरेश ढगारे बापूसाहेब ढगारे, चंद्रकांत भगत, सहदेव वांभिरे बापू वाशिलकर, वैभव भगत, विद्यार्थी, गुलाब मिरकुटे, प्रेम भगत, सिद्धेश भगत आदी ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
मुक्कामी बस सेवेस अडचण नाही
अजूनही प्रत्येक आगारात वाहक व चालक यांची संख्या कमी आहे. बहिरवाडी सारख्या दुर्गम भागाचा विचार केला असता ग्रामस्थांच्या मागणीनुसार मुक्कामी बस सेवा सुरू करण्यात कोणतीही अडचण नाही. पण मुक्कामी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची राहाण्याची व अंघोळीची व्यवस्था ग्रामपंचायतीने केल्यास बस सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचे आगार प्रमुख सागर गाडे यांनी सांगितले आहे.
02806