लालपरी खिळखिळी
बंडू दातीर
पौड, ता. १५ : परिवहन महामंडळाच्या अनास्थेमुळे पौड (ता. मुळशी) येथील एसटी बसस्थानक परिसराची दुरवस्था झाली आहे. बसस्थानकासमोरील जागेला खासगी वाहनतळाचे स्वरूप आले असून पाठीमागील पडीक मोकळ्या जागेला काटेरी झुडपांनी वेढले आहे. मुळशी धरण, माले, मुठा आणि रिहे खोऱ्यात जाणाऱ्या एसटी गेली पाच वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी पौडमधून मिनी बससेवा सुरू करण्याची गरज आहे.
बसस्थानकासाठी सुमारे तीन एकर जागा परिवहन महामंडळाच्या ताब्यात आहे. पंचेचाळीस वर्षापूर्वी बसस्थानकाची इमारती बांधली. बसस्थानक उभे राहील्यापासून केवळ एक एकर जागाच वापरात असून उरलेली जागा अद्यापही पडीक आहे. बांधलेली इमारतही जुनी जीर्ण झाल्याने बांधबंदिस्ती खिळखिळी झाली आहे. इमारतीत तीन व्यापारी दुकाने आहेत. परंतु गेली सतरा वर्षांपासून या दुकानांचे शटर उघडले गेले नाही. इमारतीच्या पाठीमागच्या बाजूला काटेरी झु़डपांनी वेढले गेले आहे. मद्यपींना दारू पिण्यासाठी ही जागा मोक्याची झाली आहे. तर इमारतीच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेला खासगी चारचाकी गाडीवाल्यांनी फुकटचे वाहनतळ बनविले आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या गाड्यांना सुरळीत वाहतुकीसाठी खासगी गाड्या अडथळा ठरत आहेत. इमारतीच्या बाजूला असलेल्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. येथे सशुल्क स्वच्छतागृह बांधले आहे.
स्वारगेटहून बेलावडे, धुमाळवाडी, भादस, वडुस्ते, कोळवण, खारावडे, कोंढूर, लव्हार्डे, आंधळे, कुंभेरी, वाळेण या ठिकाणी जाणाऱ्या गाड्या गेली पाच वर्षांपासून पूर्णपणे बंद आहेत. केवळ कोळवण मार्गावर दिवसातून चार फेऱ्या सुरू आहेत. रोहा, महाड, खेड, श्रीवर्धन, मंडणगड, दापोली, माणगाव या कोकणातील गाड्या मुळशीतून ये-जा करतात. गाड्यांतील चालक, वाहकांच्या मनमानी कारभाराला मुळशीकर पुरते वैतागले आहेत. गाडी मोकळी असतानाही पिरंगुट, पौड आणि शेडाणी फाटा व्यतिरिक्त इतर ठिकाणी गाड्या थांबविल्या जात नाही. छोट्या-छोट्या गावात जाणाऱ्या स्थानिकांना गाडीत घेतले जात नाही. त्यामुळे शाळकरी मुले, मुली, महिला, वृद्ध मंडळी यांची खूप गैरसोय होते. धरण भागातही वेळेत गाडी जात नसल्याने लोकांवर पायपीट करण्याची वेळ येते. परिणामी मुलींचे शिक्षणही थांबले आहे. स्वारगेटहून कोकणात जाणारी एकही गाडी सायंकाळी पाचनंतर पौडला बसस्थानकात जात नाही. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यात ताटकळत उभे राहावे लागते.
वास्तविक पौडमधून बेलावडे, धुमाळवाडी, भादस, जवण, मुळशी खुर्द या भागांसाठी मिनीबस सेवा सुरू करण्याची नितांत गरज आहे. एखादी राखीव मिनीबस या स्थानकात कायमची ठेवल्यास पूर्व पट्ट्यातील नागरिकांची सोयही होईल तसेच महामंडळाला उत्पन्नही मिळू शकेल. स्वारगेटपासून पौडपर्यंत येण्यासाठी पीएमटीला ७० रुपये तिकीट द्यावे लागते. मात्र एसटी मधून आल्यास ५१ रुपये द्यावे लागतात. त्यात महिला असेल तर त्यांना २६ रुपयेच तिकीट पडते. पीएमटीपेक्षा प्रवाशांना एसटी परवडते. परंतु एसटी वेळेत ये-जा करीत नसल्याने नाइलाजास्तव पीएमटीचा आधार नागरिकांना घ्यावा लागतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.