राहू, ता. २ : राहू, खामगाव, पिंपळगाव (ता. दौंड) परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून, याकडे संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
भर चौकात गावठी दारू विक्रीचा व्यवसाय खुलेआम चालू आहे. मुळा- मुठा आणि भीमा नदीच्या पात्राच्या वनविभागाच्या कुरणात मटका, ताडी, गावठी दारूधंदे चालू आहेत. अनेक ढाब्यांवर बनावट दारूची विक्री सर्रास होत आहे. दर महिन्याला नेमून दिलेल्या भरगच्च हप्त्यांपोटी याकडे स्थानिक ते वरिष्ठ अधिकारी सोईस्कर डोळेझाक करतात.
अवैध धंदे करणाऱ्यांना कोणाचे आशीर्वाद आहेत. संबंधितांवर यापूर्वी कागदी घोडे नाचवल्यासारखी थातूरमातूर कारवाई होते. मात्र, प्रत्यक्षात संबंधितांवर अद्यापपर्यंत दंडात्मक कडक कारवाई करून गुन्हे दाखल न झाल्यामुळे परिसरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावल्याने भाईगिरी वाढत चालली आहे.
आमचं कोणीच काही वाकडं करू शकत नाही. कारण आमचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी थेट आर्थिक लागेबांधे आहेत. तसेच आमचा वशिलापण दांडगा आहे. आम्हाला जे काय करायचे ते आम्ही थेट वरूनच सेटिंग लावतो, असा सज्जड दम द्यायला हे मगरूळमधील अवैध धंदेवाले मागेपुढे पाहत नाहीत.
चौकाचौकातील पानटपऱ्यांमधील बनावट दारू आणि गुटख्यामुळे परिसरातील अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जाऊ लागले आहेत. शाळा परिसरात भरदिवसा अनेक तरुण दारूच्या नशेत वावरताना दिसतात. दारू विक्रीतून लाखोंची माया कमवितात. दहशतीपोटी त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास नागरिक सहजासहजी धजावत नसल्याची स्थिती आहे. खुलेआम दारूच्या विक्रीमुळे अनेक तरुणांचे प्रपंच उघड्यावर आले आहेत. त्यामुळे पोलिसांनी कायमस्वरूपी दारूबंदी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
पोलिस अधिकाऱ्यांच्या कारवाईकडे लक्ष
पारगाव-राहू-वाघोली रस्त्यांवरील काही लॉजवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आर्थिक तडजोड करून मध्यरात्रीच्या सुमारास वेश्याव्यवसाय चालतो. अवैध धंदेवाले भाईगिरी, गुंड प्रवृत्तीचे आहेत. मगरूळमधील या निगरगठ्ठ्यांना नेमका कोणाचा वरदहस्त आहे. परिसरातील अवैध धंदेवाल्यांवर जिल्हा पोलिस संदीपसिंग गिल यांचे पथक थातूरमातूर कारवाई करणार की त्याचे कायमचे कंबरडे मोडणार, की त्यांना आणखीन खतपाणी घालणार? याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पोलिसांचा धाक राहिला नाही
दौंड तालुक्यात पोलिसांचा धाक न राहिल्याने सर्वत्र अवैध व्यवसाय सुरू असून, गुन्हेगार मोकाट आहेत. तालुक्यात जुगाराचे अड्डे, गोहत्या, अवैध प्रवासी वाहतूक, दुचाकी वाहनांची चोरी, एमआयडीसीमधील भाईगिरी, चोऱ्या, गावठी दारूचे अड्डे, गांजा विक्री, बनावट दारू, वेश्याव्यवसाय, मार्गावरील वाटमारी आदी प्रकार राजरोसपणे सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.