जनतेच्या मनावर अधिराज्य
खेड तालुक्याच्या राजकारणावर व प्रशासनावर तीस वर्षे ज्यांचा प्रभाव आहे असे धुरंधर व्यक्तिमत्त्व म्हणजे दिलीप मोहिते पाटील हे होत. सत्ता असो किंवा नसो जनतेच्या मनावर अधिराज्य असलेला आमदार म्हणजे दिलीप मोहिते पाटील होय.
- राजेंद्र सांडभोर, राजगुरुनगर
पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव या छोट्या गावातून पुढे आलेल्या दिलीपरावांनी तीनदा तालुक्याचे आमदारपद भूषविले. आपल्या आमदारकीच्या माध्यमातून त्यांनी तालुक्याचा सर्वांगीण कायापालट घडवला. लोकसेवा, समाजसेवा हा जणू त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनून राहिला. लोकांसाठी काम करण्याचे व्रतच त्यांनी घेतले. जिद्द आणि धडाडीतून त्यांचे राजकीय कर्तृत्व फुलले. राजकारणात मुळात तुमच्याकडे एक दृष्टी असावी लागते, एक ध्येय असावे लागते आणि ते गाठण्याचा ध्यास असावा लागतो. ध्येयपूर्तीसाठी प्रसंगी परिस्थितीशी चार हात करण्याची तयारी असावी लागते. ध्येय गाठण्याच्या प्रवासातील खाचखळग्यांना, चढ-उतारांना हसत खेळत सामोरे जाण्याची वृत्ती असावी लागते. एखादे अपयश आले, तर त्याने खचून न जाता जिद्दीने पुढे पाऊल टाकावे लागते. यशस्वी व लोकाभिमुख नेतृत्वाला आवश्यक असलेले हे सर्व पैलू दिलीपराव मोहिते पाटलांमध्ये आहेत. म्हणूनच त्यांनी तब्बल तीन दशके खेड तालुक्याच्या राजकारणावर आपला प्रभाव ठेवला. सत्ता असो किंवा नसो, त्यांचाच ठसा तालुक्याच्या राजकारणावर व विकासावर राहिला.
अजितदादांनी नेता हेरला
दिलीप मोहिते सन १९९२मध्ये प्रतिकूल परिस्थितीत अपक्ष जिल्हा परिषद सदस्य झाले. तेव्हापासून मोहिते युग तालुक्यात सुरू झाले. त्यानंतर तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीत त्यांचा निर्णायक सहभाग होता. महिला राखीव जागा आल्याने त्यांच्या जिल्हा परिषद मतदारसंघात त्यांच्या सुविद्य पत्नी सुरेखाताई मोहिते सन १९९७मध्ये निवडून आल्या. त्यानंतरची सन १९९९ची विधानसभा निवडणूक त्यांनी स्व. माजी आमदार नारायणराव पवार या दिग्गज आणि मुरब्बी नेत्याविरोधात शिवसेनेकडून लढविली. ते विजयासमीप गेले होते, पण थोड्याशा मतांनी त्यांना पराभूत व्हावे लागले. मात्र, पराभवानंतरही ते थांबले नाहीत, कारण त्यांचा तो स्वभावच नव्हता. अक्षरशः दुसऱ्या दिवसापासूनच त्यांनी कामाला सुरुवात केली. खेड तालुक्यात सामूहिक विवाहाची चळवळ सुरू केली. स्वतः सामुदायिक विवाह सोहळे आयोजित केले. तालुकाभर कार्यकर्त्यांचे संघटन उभे केले. त्यांचे काम पाहून अजितदादा पवार यांनी हा नेता हेरला आणि सन १९९२मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांचा प्रवेश करून घेतला.
‘असाध्य ते साध्य’
अजितदादांनी सन २००४मद्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट दिले आणि सन १९९९च्या पराभवाची परतफेड करून ते आमदार झाले. आमदार होताच त्यांनी विकासाचा झंझावात सुरू केला. विकास कामे करून, कार्यकर्ते जोडून आणि सतत लोकांच्या सुख- दुःखात जाऊन स्वतःचे मजबूत अस्तित्व निर्माण केले. असंख्य रस्ते, पूल, शाळा, दवाखाने, बंधारे, पाणीयोजना, सभामंडप, स्मशानभूमी, व्यायामशाळा, आरोग्य केंद्रे, सार्वजनिक इमारती उभारल्या. खेड तालुक्यातील एकही गाव असे नाही, जेथे त्यांनी काम केले नाही. शिवाय विकास कामे करण्याची त्यांची पद्धतही असाधारण होती. ‘असाध्य ते साध्य’ करण्याचा जणू त्यांचा पिंडच होता. पाणलोट क्षेत्रात त्यांनी पूल आणि बंधारे बांधले. राज्यातील पहिला पीपीपी म्हणजे ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’ तत्त्वावरील आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) त्यांनी भारत फोर्ज कंपनीच्या भागीदारीतून राजगुरूनगरजवळ चांडोली येथे उभारला. विकासकामांमुळे सन २००९मध्ये विधानसभेत त्यांना सहज यश मिळाले. पुन्हा विकासकामांचा धडाका सुरु झाला. खेडला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय मंजूर झाले होते. ते नव्या इमारतीत आणले गेले. चाकण औद्योगिक वसाहतीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. आश्रमशाळांच्या इमारती झाल्या. वीज उपकेंद्रे झाली. ढीगभर कामे झाली.
आमदार नसतानाही दबदबा कायम
विकासकामांच्या जोरावर ते सन २०१४मध्ये पुन्हा विजयी होतील,
असा विश्वास सगळ्यांना होता. पण, मोदी लाटेने सगळे अंदाज उलटेपालटे करून टाकले. त्या लाटेत पुणे जिल्ह्यातील, बारामती व आंबेगाव वगळता सर्व मतदारसंघ वाहून गेले. कामे करूनही अपयश आल्याने दिलीपअण्णा खंतावले. पण अल्पावधीतच नवीन उपक्रम हाती घेतले. त्यांनी हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली होतीच. त्याद्वारे डेहणे येथे पश्चिम भागातील मुलांसाठी महाविद्यालय सुरू केले. राजगुरुनगरला लिटल चॅम्पस् इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केले. तसेच मुलींसाठी महाविद्यालय सुरू केले. पुण्याशिवाय इतरत्र कोठेही कायद्याच्या शिक्षणाची सुविधा नव्हती, म्हणून त्यांनी राजगुरुनगरला विधी महाविद्यालय सुरू केले. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना व विशेषतः मुलींना, कायद्याच्या शिक्षणाची पर्वणी उपलब्ध झाली. याच काळात त्यांनी जिल्हा बँकेची निवडणूक लढविली आणि मोठ्या मताधिक्याने जिंकून संचालक झाले. बाजार समितीला पॅनेल निवडून आणले. आमदार नसतानाही या निवडणुका जिंकून राजकीय दबदबा त्यांनी कायम ठेवला. राजगुरुनगर, चाकण, शेलपिंपळगाव, पाईट, डेहणे या ठिकाणच्या बाजार आवारांची विकासाची कामे त्यांनी केली.
अनपेक्षित पराभवाने सर्वच अचंबित
विधानसभेची सन २०१९ची निवडणूक त्यांना खूपच सोपी गेली. कोरोनाच्या कठीण काळानंतर त्यांनी हुतात्मा राजगुरू स्मारक, चाकण उपजिल्हा रुग्णालय, सुमारे ५०० कोटींच्या विविध गावांच्या पाणीपुरवठा योजना, खेड न्यायालयाची नवीन इमारत इत्यादी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले. नियमित विकासकामे तर सुरूच होती. प्रशासकीय इमारत, कृषीभवन, कडूस शिरदाळे रस्ता आदी अनेक प्रकल्पांना मंजुरी आणली. कोट्यवधी रुपयांचा निधी विकासकांसाठी आणला. तरीही राजकारणाचे वारे फिरले. ते सन २०२४च्या निवडणुकीत पराभूत झाले. अतिशय अनपेक्षित पराभवाने सर्वजण अचंबित झाले. राज्यात पक्ष सत्तेवर आला, मात्र तालुक्यात जनमत विरोधात गेले. भरपूर चिंतन, विश्लेषण झाले, पण पराभवाची ठोस कारणमीमांसा कोणाला करता येईना.
विकास भरपूर झाला, पण जनसंपर्क कमी पडल्याचा तर्क पुढे आला. कार्यकर्ते गाफील राहिल्याच्या चर्चा झाल्या. अनेक कार्यकर्त्यांनी तर ईव्हीएममध्येच घोटाळे झाल्याचे आरोप केले. काहीही घडले असले तरी पराभवाचे कटू घोट वाट्याला आले, हे वास्तव उरलेच.
सत्ता असो अथवा नसो...
आतातरी दिलीपअण्णा विश्रांती घेतील, असा अनेकांचा कयास होता. पण सत्ता जाऊनही पाटीलवाडा माणसांनी गजबजू लागला. अण्णांना काम सांगण्याची लोकांची सवय तशीच चालू राहिली. आजही सकाळी चार- पाच तास अण्णा लोकांच्या समस्या सोडविण्यात व्यस्त असतात. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या मोर्चेबांधणीलाही इथे सुरूवात झाली आहे. तालुक्यात सत्ता नाही, तरी त्यांच्या कामात फारसा खंड पडलेला दिसत नाही. तालुक्यातील त्यांचा वावर आणि रोजचा दिनक्रम पाहता राजकारणातून ते बाजूला पडण्याची शक्यता अजिबात दिसत नाही. त्यांचा सार्वजनिक जीवनातील सहभाग पाहता, पुढची विधानसभाही ते लढवतील, याविषयी कुणी शंका घेणार नाही. शेवटी सत्ता असो अथवा नसो, दिलीप मोहिते पाटलांचा खेडच्या राजकारणातील प्रभाव पुसता येणार नाही, हेच खरे!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.