राजगुरुनगर/ पाईट / चाकण, ता. ११ : पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील पाईट या गावाजवळील डोंगररांगेतील एका उंच डोंगरावर असलेल्या कुंडेश्वर मंदिरात महिलांना दर्शनाला घेऊन चाललेला पिकअप टेम्पो उलटून दरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात १० महिला मृत्युमुखी पडल्या, तर २५ महिला जखमी झाल्या. तसेच, २ मुले व टेम्पोचालक जखमी झाला. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हा भीषण झाला. मृत आणि जखमी महिला, अशा सर्व महिला पाईटजवळीलच पापळवाडी या खेड्यातील आहेत. काळाने घातलेल्या या क्रूर घाल्याने पाईट आणि पापळवाडीवर भीषण शोककळा पसरली. त्यामुळे दुपारनंतर पाईट गाव ग्रामस्थांनी बंद ठेवले, तसेच उद्याही पाईट गाव बंद ठेवणार आहेत.
श्रावणी सोमवारनिमित्ताने पाईटजवळील डोंगररांगेत असलेल्या कुंडेश्वर मंदिर दर्शनासाठी पापळवाडी येथील ३५ महिला व २ मुले पिकअप टेंपोमध्ये बसून जात होत्या. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कुंडेश्वर घाटातील पहिल्या तीव्र चढावर टेम्पो चढताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो उलटला. काही पलट्या घेत तो सुमारे १०० ते १५० फूट खाली दरीत कोसळला. त्यामुळे टेम्पोतील (क्र. एमएच १४ जीडी ७२९९) सर्व ३५ महिला व २ मुले जखमी झाले. त्यातील १० मृत्युमुखी पडल्या आणि अनेक गंभीर जखमी झाल्या.
ही घटना पाईट गावात समजताच एकच काहूर उठले. लोकांनी व कार्यकर्त्यांनी युद्ध पातळीवर मदतकार्य हाती घेतले. भाजप नेते शरद बुट्टे पाटील यांनी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिका बोलाविल्या. स्थानिक नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका युवक अध्यक्ष जयसिंग दरेकर व कार्यकर्त्यांच्या मदतीने १० रुग्णवाहिका व १२ खासगी वाहनातून जखमींना तातडीने राजगुरुनगर (चांडोली) ग्रामीण रुग्णालयात आणि वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी आणि उपचारांदरम्यान मिळून १० महिला मृत्युमुखी पडल्याचे चांडोली ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. तेजश्री रानडे यांनी सांगितले. इतर २५ महिला, २ मुले आणि चालक जखमी असून त्यांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. टेंपोचालक ऋषिकेश करंडे याने बरोबर घेतलेला आपल्या नातेवाइकाचा मुलगा साईराज डांगले याला बाहेर फेकल्याने गंभीर जखमी झाला नाही. मात्र तो स्वतः जखमी झाला. या घटनेमुळे पापळवाडीवर शोककळा पसरली.
दरम्यान, चांडोली ग्रामीण रुग्णालयास आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, भाजप नेते शरद बुट्टे पाटील, बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे, अरुण चांभारे,भगवान पोखरकर, रामदास धनवटे, विजया शिंदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, नायब तहसीलदार राम बीजे, उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, जयसिंग दरेकर
यांनी भेट देऊन विचारपूस केली व सूचना दिल्या.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे पुढीलप्रमाणे : शोभा ज्ञानेश्वर पापळ (वय २७), सुमन काळूराम पापळ (वय ४७), शारदा रामदास चोरघे (वय ४५), मंदाबाई कानिफ दरेकर (वय ५५), संजाबाई कैलास दरेकर (वय ५५), मीराबाई संभाजी चोरगे (वय ५५), बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर (वय ५५), शकुंतला तानाजी चोरघे (वय ६०), पार्वताबाई दत्तू पापळ (वय ५३), फसाबाई प्रभू सावंत (वय ६०).
अपघातात जखमी महिलांची नावे पुढीलप्रमाणे : अलका शिवाजी चोरघे, रंजना दत्तात्रेय कोळेकर, मालूबाई लक्ष्मण चोरघे, जयश्री बाळू दरेकर, लताताई करंडे, ऋतुराज कोतवाल, ऋषिकेश करंडे, निकिता पापळ, जयश्री पापळ, मनीषा दरेकर, लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर, कलाबाई मल्हारी लोंढे, जनाबाई करंडे, सुप्रिया लोंढे, निशांत लोंढे, सिद्धी ज्ञानेश्वर पापळ, कविता सारंग चोरगे, सुलाबाई बाळासाहेब चोरघे, सिद्धी रामदास चोरगे, छबाबाई निवृत्ती पापळ, सुलोचना कोळेकर, मंगल शरद दरेकर, चित्रा शरद करंडे, चंद्रभागा दत्तात्रेय दरेकर, मंदा चांगदेव पापळ, प्रतीक्षा पाटोळे, पार्वताबाई कोळेकर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.