इंदापूर, ता. ३० : इंदापुरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या इंदापूर महाविद्यालयासमोरील चौकात सोमवारी (ता. ३०) रोजी सायंकाळी सात वाजेदरम्यान पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्या एका ३० वर्षीय युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली. यामध्ये दुचाकीवर आलेले अज्ञात हल्लेखोर संबंधित युवकाच्या पाठीवर चार गोळ्या झाडत पसार झाले. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर शहरातील जुन्या पुणे-सोलापूर महामार्गावरील इंदापूर महाविद्यालयासमोरील चौकात राहुल अशोक चव्हाण (वय ३० वर्षे, रा. शिरसोडी ता. इंदापूर) हा सोमवारी सायंकाळी सात वाजेदरम्यान महाविद्यालयाच्या मैदानावर सराव घेऊन प्रवेशद्वारावर पार्किंग केलेल्या दुचाकीच्या ठिकाणी आला असताना दुचाकीवर तोंडाला बांधून आलेल्या एका हल्लेखोराने राहुलच्या पाठीवर गोळ्या झाडल्या. यामुळे तो जमिनीवर कोसळला यावेळी त्याच्या डोक्यालाही मार लागला. यावेळी चौकात गर्दी असल्याने त्या ठिकाणी मोठी धावपळ उडाली. गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, जखमी राहुलला इंदापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.
पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह पथकाने तत्काळ घटनास्थळी भेट देत बुलेटच्या पुंगळ्या ताब्यात घेत आरोपीच्या शोधासाठी विविध भागांत पथके रवाना केली आहेत. तसेच अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनीही तत्काळ घटनास्थळ व रुग्णालयास भेट देत जखमीच्या तब्येतीची विचारपूस करत परिस्थितीचा आढावा घेऊन तपासाबाबत मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.