सोमेश्वरनगर, ता. १५ ः राज्यभरातील विद्यार्थ्यांना मूल्याधारित शिक्षण मिळावे, यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून २०१६ ते २०२० या कालावधीत मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात आला होता. आता पुन्हा एकदा शालेय शिक्षण विभागामार्फत २०२५ ते २०३० या कालावधीसाठी ‘मूल्यवर्धन ३.०’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या मोहिमेसाठी १६ जूनपासून राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण वाघोली, पुणे येथे सुरू करण्यात येणार आहे.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत कृतीयुक्त व मूल्याधारित शिक्षणासाठी ‘मूल्यवर्धन’ उपक्रमास केंद्रीय प्रकल्प मान्यता मंडळाची मान्यता प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) यापूर्वी २०१६- २०२० या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी मूल्यवर्धन उपक्रम राबविण्यात आला. गोवा राज्यानेही या उपक्रमाचा स्वीकार केला होता. या पार्श्वभूमीवर आता नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत असा ‘मूल्यवर्धन ३.०’ कार्यकम पहिली ते आठवीसाठी २०३० पर्यंत राबविला जाणार आहे. नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण विभाग व शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन यांच्यात या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत सामंजस्य करार झाला होता. त्यानुषंगाने राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम पार पडणार आहे.
पहिल्या टप्प्यात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित असलेल्या पहिली ते आठवीच्या मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये अंमलबजावणी केली जाणार आहे. सुरुवातीला राज्यभरातील ८४५ निवडक शिक्षकांचे पाच टप्प्यात प्रशिक्षण होणार आहे. १६ जूनपासून १८ जुलैपर्यंत भारतीय जैन संघटनेच्या शैक्षणिक पुनर्वसन केंद्र बकोरी फाटा वाघोली, पुणे येथे सुरू होणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे प्राचार्य नामदेव शेंडकर यांनी दिली.
प्रशिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे
तारीख शिक्षकसंख्या जिल्हे
१६ ते २० जून १२२ बुलढाणा, नागपूर, भंडारा, चंध्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, अकोला
२३ ते २७ जून १६६ छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशीव, नांदेड
३० जून ते ४ जुलै १६९ कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक
७ जुलै ते ११ जुलै २२० बीड, अमरावती,वाशिम, यवतमाळ, जळगाव, नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर, पालघर
१४ ते १८ जुलै १७० मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.