सोमेश्वरनगर, ३० : पिढ्यानपिढ्या टीपरी ऊस लागवड करणारा सोमेश्वर साखर कारखान्याचा शेतकरी आता पट्टापद्धतीने रोप लागवड करण्याकडे वळला आहे. चालू हंगामात तब्बल पन्नास टक्के लागवड रोपांचीच होणार आहे. चालू वर्षी एक जुलैपासून सुरू होणाऱ्या आडसाली हंगामाच्या सुरुवातीलाच तब्बल दोन कोटी ऊस रोपांची नोंदणी शेतकऱ्यांनी केले आहे.
याशिवाय काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी स्वतःच घरच्या घरी कमी खर्चात रोपे तयार केली आहेत. गतवर्षी दोन महिन्याच्या आडसाली हंगामात कारखान्याकडे साठ लाख रोपांची नोंदणी झाली होती. यंदा यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाडेगाव ऊस संशोधन केंद्र, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व कारखान्याच्या प्रेरणेतून सोमेश्वरच्या सभासदांनी आतापर्यंत अनेक प्रयोग करत एकरी ऐंशी ते शंभर टनांचे उद्दिष्ट गाठले आहे. त्यामुळे सोमेश्वरचे एकरी उत्पादन राज्याच्या सरासरीपेक्षा दहा-बारा टनांनी जास्त आहे. या शेतकऱ्यांचा आता रोप लागवडीकडे कल वाढला आहे.
यंदा सतत पावसाने शेतजमिनींची अक्षरशः तळी झाली होती. पावसाच्या पार्श्वभूमीवर उसाचे टीपरी बेणे तोडा, वाहून न्या, पाणी देऊन पुरा अशी झंजट करणे अत्यंत अवघड आहे. शिवाय ओलाव्याने टीपऱ्यांचे नाजूक डोळे कुजण्याची शक्यता जास्त असते. पाऊस झाल्यास पुनर्लागवड करावी लागते. याऐवजी एक महिना वय झालेले रोप लावले तर ते जगण्याची शक्यता जास्त असते. शिवाय रोपलागवडीचे उत्पादन खात्रीने अधिक येते.
चालू आडसाली हंगामात एक जुलैपासून ऊस लागवडीचा परवानगी आहे.
पावसाच्या पार्श्वभूमीवर लागवड कमी होईल असा अंदाज धुडकावून लावत सभासदांनी ओल्या सऱ्यांमध्ये रोप लागवडीचा पर्याय निवडला आहे. सोमेश्वरकडे एक कोटी रोपांची नोंद झाली आहे. शिवाय कारखान्याकडे न जाता काही शेतकऱ्यांनी खासगी नर्सरींमधून रोपे मागविली आहेत. तीही जवळपास एक कोटीपर्यंत आहेत. गतवर्षी कारखान्याकडे एक जुलैसाठी १५ लाख आणि संपूर्ण आडसाली हंगामासाठी साठ लाख रोपांची नोंदणी झाली होती.
शेतकऱ्यांकडून सुपरकेन नर्सरी
सोमेश्वरच्या काही शेतकऱ्यांनी स्वतःच सुपरकेन नर्सरी तयार केली असून, घरच्या चांगल्या प्रतिच्या उसापासून एक महिन्यापूर्वीच रोपे तयार करून ठेवली आहेत. हनुमंत जगताप म्हणाले, बाहेर अडीच-तीन रुपयापर्यंत एका रोपाचा खर्च होतो. आम्ही घरच्या घरी एक रुपया खर्चात रोप तयार केले आहे.
एक जुलैच्या ऊस लागवडीसाठी आतापर्यंत ५७०० एकर ऊस लागवडीची नोंद आली आहे. त्यापैकी तब्बल २६९८ एकर लागवड रोपांची (दीड कोटी रोपे) आहे. गतहंगामात संपूर्ण आडसाली हंगामात साठ लाख रोपांची लागवड झाली होती. अधिक ऊस उत्पादनाचे ध्येय आणि पावसाचा सततचा अडथळा या पार्श्वभूमीवर कारखान्याकडे एक कोटी व खासगीकडेही असंख्य रोपे बुक झाली आहेत.
- बापूराव गायकवाड, शेती अधिकारी, सोमेश्वर साखर कारखाना
04680
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.