सोमेश्वरनगर, ता. २४ : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने सन २०२४-२५ या गाळप हंगामासाठीचे पुरस्कार बुधवारी (ता.२४) जाहीर झाले. उत्कृष्ट नफा निर्देशांक, व्याजाचा कमी खर्च, उत्कृष्ट तांत्रिक क्षमता, ऊसविकास, उपपदार्थ अशा सर्वच बाबींमध्ये ‘सोमेश्वर’ने राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याने ‘वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना’ हा महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. यामुळे सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथे संचालक मंडळांनी पेढे भरवून आनंद साजरा केला.
‘सोमेश्वर’ला २०१३-१४ पासून साखर उद्योगातील नामांकित संस्थांकडून बारा पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील सर्वोच्च पुरस्कार गतवर्षी मिळाले. यामध्ये ‘व्हीएसआय’च्या वतीने २०२३-२४ चा राज्यातील सर्वोत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, बेस्ट फायनान्स मॅनेजर, सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता असे तीन पुरस्कार मिळाले होते. कोजनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचा देशातील सर्वोत्कृष्ट सहवीजनिर्मिती प्रकल्प पुरस्कार मिळाला होता. याशिवाय राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार नुकताच मिळाला होता. आता राज्यातील सर्वोत्कृष्ट कारखाना पुरस्कारावरही सोमेश्वरने आपली निर्विवादपणे मोहोर उमटवली आहे.
साडेसात हजार टन प्रतिदिन गाळप आणि ३२ मेगावॉट वीजनिर्मिती करणाऱ्या सोमेश्वरने तांत्रिक क्षमतेचा सर्वोच्च वापर करत साखर उतारा गेली नऊ वर्षे उच्चांकी राखला आहे. कारखान्याचा नफा निर्देशांक, इन्व्हेंटरी टर्न ओव्हर रेशो राज्यातील अन्य कारखान्यांपेक्षा चांगला आहे. राज्याचा साखर उत्पादन खर्च ५९१ रुपये, एकूण उत्पादन प्रक्रिया खर्च ९०५ रुपये, खेळत्या भांडवलावरील व्याज खर्च ११२ रुपये प्रतिक्विंटल असताना सोमेश्वरचा अनुक्रमे फक्त ३८५ रुपये, ६१४ रुपये, ९५ रुपये प्रतिक्विंटल इतका आहे.
सर्वांच्या सहकार्यामुळे पटकविले नामांकित पुरस्कार
अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व कार्यकारी संचालक राजेंद्र यादव म्हणाले, मागील पाच हंगामातील आर्थिक, तांत्रिक, व्यवस्थापन, ऊसविकास आदी सर्व बाबींचा विचार करून हा पुरस्कार दिला जातो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मार्गदर्शन, सभासदांचा पाठिंबा, संचालक मंडळाचे निर्णय आणि कामगार, अधिकारी, वाहतूकदार, तोडणी मजूर आदी सर्वांच्या सहकार्यामुळे राज्यातले आणि देशातले नामांकित पुरस्कार मिळू शकले.
यामुळे मिळाला पुरस्कार
गाळपक्षमतेचा १११ टक्के वापर
वीजवापर २९.९४ किलो प्रतिटन
बगॅसबचत ७.२१ टक्के
मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल स्टॉपेजेस केवळ ०.०६ टक्के
अॅपद्वारे ऊसनोंद व क्षेत्रमोजणी
खोडवा व्यवस्थापन व हुमणी नियंत्रण
एआयचा शेतीत आणि कारखान्यात वापर
आसवणीची क्षमता ११६ टक्के
साखरेचा उत्पादन प्रक्रिया खर्च मात्र ३८५ रुपये प्रतिक्विंटल
एकूण उत्पादन खर्च ६१४ रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.