शिरूर, ता. ९ : शिरूर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या पाच जागांसाठी रविवारी (ता. ९) झालेल्या निवडणुकीत माजी आमदार अशोक पवार समर्थकांची सरशी झाली. संघाच्या १७ पैकी १२ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून, त्यातील दहा जागांवर आमदार माऊली कटके समर्थकांची वर्णी लागली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत दहा - सात असे बलाबल दिसत असले तरी संघाच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडीपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडींची शक्यता आहे.
खरेदी-विक्री संघाच्या १७ पैकी १२ जागांवर रांजणगाव गटातून विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नरवडे, कारेगाव गटातून राहुल गवारे, न्हावरे गटातून नामदेव गिरमकर, पाबळ गटातून लहूजी थोरात, तळेगाव ढमढेरे गटातून गुलाब सातपुते, शिक्रापूर गटातून बाळासाहेब टेमगिरे, धामारी गटातून कानिफनाथ भरणे यांची तसेच अनुसूचित जाती जमाती गटातून विवेक सोनवणे, महिला प्रतिनिधी म्हणून मनीषा शेलार व सुजाता नरवडे, इतर मागास प्रवर्गातून संभाजी भुजबळ व भटक्या विमुक्त जाती गटातून शरद कालेवार यांची बिनविरोध निवड झाली होती. यापैकी दहा जागांवर आमदार कटके गटाने दावा केला होता. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेल्या जल्लोषात दहा संचालकांचा आमदार कटके यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे चिन्ह असलेल्या घड्याळाच्या पट्ट्या घालून सन्मान केला होता. उर्वरित पाच जागांसाठी आज चुरशीने निवडणूक झाली. आज मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक अरुण साकोरे यांनी निकाल जाहीर केले. त्यानुसार सोसायटी मतदार संघाच्या टाकळी हाजी गटातून महेंद्र सुरेश पाचर्णे हे २८ पैकी १९ मते घेऊन विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी प्रमोद दंडवते यांना केवळ नऊ मते मिळाली.
मांडवगण फराटा व वडगाव रासाई गटात चुरस
मांडवगण गटातून संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब नागवडे विजयी झाले. त्यांना १४, तर त्यांचे प्रतिस्पर्धी गणेश साळुंके यांना १३ मते मिळाली. वडगाव गटातून विजयी झालेले सुरेशचंद्र ढवळे यांना ११, तर त्यांचे प्रतिस्पर्धी शरद साठे यांना दहा मते मिळाली. वैयक्तिक सभासद मतदार संघाच्या दोन जागांवर सर्वाधिक ११३१ मते मिळवून संघाचे विद्यमान संचालक सर्जेराव दसगुडे व १११५ मते मिळवून नवनाथ ढमढेरे यांची वर्णी लागली. नितीन थोरात यांना पराभव पत्करावा लागला. त्यांना केवळ २२१ मते मिळाली.
शिरूर : खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर माजी आमदार अशोक पवार समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.