सासवड, ता. १९ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुरंदर तालुक्यातील १३ शाखांमधील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांमार्फत सन २०२२-२३ मध्ये वितरित झालेल्या खरीप आणि रब्बी हंगामातील पीककर्जाच्या व्याजापोटी राज्य शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून ३ कोटी ४७ लाख ३५ हजार ७०८ रुपयांचा व्याज परतावा मंजूर झाला आहे. ही रक्कम लवकरच १८ हजार १३० शेतकऱ्यांच्या बँक बचत खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक आणि पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय चंदूकाका जगताप यांनी दिली.
जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजाने मिळत होते. मध्यंतरी दोन वर्षे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, शेतकऱ्यांनी भरलेल्या व्याजाची सात टक्के रक्कम त्यांना परत केली जात होती. यात केंद्र आणि राज्य शासनाचा प्रत्येकी ३ टक्के वाटा होता. यातील २०२२-२३ मधील राज्य सरकारचा व्याज परतावा मिळाला आहे. आता पुन्हा जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजाने देण्यात येत आहे.
याबाबत माजी आमदार जगताप म्हणाले की, राज्य सरकारच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून सन २०२२-२३ मध्ये पुरंदरमधील १८ हजार १३० शेतकऱ्यांसाठी एकूण तीन कोटी ४७ लाख ३५ हजार ७०८ रुपये मंजूर झाले आहेत आणि ही रक्कम या आठवड्यात त्यांच्या खात्यात जमा होईल.
बैठकीत जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी महेंद्र खैरे, पुरंदरमधील विकास सोसायट्यांचे समन्वयक अनिल उरवणे, बँकेचे वसुली अधिकारी किरण जाधव, विकास अधिकारी जयेश गद्रे, राजन जगताप, अण्णा शिंदे, शरद वणवे, मयूर भुजबळ, पवन दुर्गाडे, मंगेश घोणे, शिरीष जाधव यांच्यासह अनेक अधिकारी आणि सोसायट्यांचे सचिव उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.