सासवड, ता. २९ : पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू असतानाच, बाधित शेतकऱ्यांच्या हरकती स्वीकारण्यासाठी नियुक्त केलेले अधिकारी सतत गैरहजर राहत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. हरकती देण्यास दिरंगाई होत शेतकरी संतप्त झाले आहेत.
केंद्र शासनाच्या वतीने वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव या सात गावांमध्ये २८३२ हेक्टर जमिनीवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच तीव्र विरोध आहे. यापूर्वी शासनाने ड्रोनद्वारे सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला असता, शेतकऱ्यांनी तो हाणून पाडला होता. त्यानंतर पोलिसांनी लाठीहल्ला करून गुन्हे दाखल केले होते, ज्यामुळे संघर्ष आणखी वाढला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व्हे रद्द केल्याची घोषणा केली असली तरी, भूसंपादनाची प्रक्रिया मात्र सुरूच आहे.
प्रकल्प बाधित सातही गावातील शेतकऱ्यांना भूसंपादन करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर ‘प्रस्तावित पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादन’ अशा प्रकारचा शेरा मारण्यात आला आहे. शेतकऱ्यांकडून हरकती मागवण्यासाठी नोटिसा देण्यात आल्या असून, अंतिम मुदत जवळ आली आहे. मात्र, हरकती स्वीकारण्यासाठी नियुक्त केलेले उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी, कल्याण पांढरे (वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण), संगीता चौगुले (पारगाव) आणि वर्षा लांडगे (खानवडी, एखतपूर, मुंजवडी) हे अनेकदा अनुपस्थित राहत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या हरकती वेळेत जमा करण्यात अडचणी येत आहेत.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना विचारले असता, त्यांनी माहिती घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, शासनाच्या या मनमानी कारभारावर आणि अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाची मुदत संपल्यावर अधिकारी शेतकऱ्यांनी सहकार्य केले नाही असे वरिष्ठ कार्यालयाला कळवून मोकळे होतील आणि शेतकऱ्यांची मात्र अडचण वाढवतील, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
05012
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.