तळेगाव ढमढेरे, ता. १२ : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) हद्दीतील अमोल सोपान काळकुटे यांच्या गोठ्यातील जनावरांवर बिबट्याने हल्ला करून, गायीची सुमारे दोन वर्षे वयाची कालवड ठार केली आहे. वनरक्षक प्रमोद पाटील यांनी शुक्रवारी सकाळी मृत कालवडीचा पंचनामा केला आहे.
निमगाव म्हाळुंगी व कासारी सीमेलगत अमोल काळकुटे यांच्या शेतात जनावरांचा गोठा आहे. गोठ्यात एकूण १५ जनावरे आहेत. शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान बिबट्याने गायीच्या कालवडीवर हल्ला करून फडशा पाडला. बिबट्या आल्याचे दिसताच गोठ्यातील म्हशीने दोरखंड तोडून बिबट्याला प्रतिकार केला. त्यातील लहान कालवडीवर मात्र बिबट्याने हल्ला करून कालवड ठार केली. म्हशीमुळे इतर जनावरे वाचली. बांधलेली म्हैस सुटली नसती तर बरीच जनावरे बिबट्याने मारली असती, असे काळकुटे यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून निमगाव म्हाळुंगी व कासारी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, अनेक जनावरांवर व पाळीव कुत्र्यांवर हल्ले केले आहेत. निमगाव म्हाळुंगी व कासारी परिसरातील बिबटप्रवण क्षेत्राची वनविभागाने पाहणी करून पिंजऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
परिसरात ऊसतोडणी सुरू असल्याने बिबट्याचे वास्तव्य असलेली जागा रिकामी झाल्याने बिबटे सैरभैर झाले आहेत, त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा लोकवस्तीकडे वळवला असून जनावरे व पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले होत आहेत. बिबट्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे दिवस आणि रात्री शेतात जाण्यास शेतकरी, शेतमजूर व ऊस तोडणी कामगार घाबरत आहेत. दरम्यान, सध्या निमगाव म्हाळुंगी, विठ्ठलवाडी व शिक्रापूर येथे प्रत्येकी एक पिंजरा वनविभागातर्फे लावण्यात आला असून, आणखी पिंजऱ्यांची मागणी करण्यात आली असल्याचे वनरक्षक प्रमोद पाटील यांनी सांगितले.