थेऊर, ता. ३० : महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका १८ वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी कॉर्नर परिसरात घडली असून, सोमवारी (ता. २९) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
आदित्य धनंजय नागरगोजे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे मामा ज्ञानेश्वर रामकृष्ण आंधळे (वय ४१, रा. किनगाव, अहमदपूर) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य हा लोणी काळभोर (ता. हवेली) येथील महाविद्यालयात पदवीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. आदित्य हा सोमवारी सकाळी राहत्या घरात फॅनच्या अँगलला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. शेजारच्या नागरिकांनी या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली. माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या पोलिस हवालदार राणी खामकर, वैशाली नागवडे, बीट मार्शल निखिल मेमाणे, शिंगाडे घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी आदित्य याला खाली उतरवून येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. आदित्य याचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेत शवविच्छेदन करण्यासाठी पुण्यातील रुग्णालयात पाठविला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करत आहेत.