उरुळी कांचन, ता. २३ : एमआयटीने ओढ्यावर केलेले नऊ मीटर अतिक्रमण व नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर केलेले अतिक्रमण, पीएमआरडीने तातडीने काढून रस्ता नागरिकांसाठी मोकळा करून द्यावा, असा ठराव लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. तसेच पाटबंधारे खात्याच्या वतीने ग्रामपंचायतीला चुकीची नोटीस बजावली याबद्दल निषेध करण्यात आला.
सरपंच तथा प्रशासक नागेश काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. २३) झालेल्या या विशेष ग्रामसभेत वरील ठरावासह अन्य ठराव करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शीतल कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी, माजी अध्यक्ष विठ्ठल काळभोर, शिवसेनेचे रमेश भोसले, संतोष भोसले, पोलिस पाटील लक्ष्मण काळभोर, सूर्यकांत काळभोर, सिद्धेश्वर काळभोर आदींनी वरील ठराव मांडले. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुळा-मुठा नदीपात्रालगत लोणी-काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील जमा होत असलेला कचरा टाकण्यात येत होता. गेल्या १५ दिवसांपूर्वी त्याने पेट घेतल्याने, त्याचा त्रास विद्यार्थ्यांना झाला. त्यामुळे कचरा टाकण्याविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याने लोणी-काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही ग्रामपंचायतींच्या हद्दीतील लोकवस्तीत कचरा न उचलला गेल्याने अक्षरशः कचऱ्याचे ढीग साठले आहेत.
ग्रामसभेतील प्रमुख ठराव
शासनाने गट क्रमांक ३९ मध्ये लोणी काळभोर व अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊर गावाला जोडणारा नकाशातील रस्ता मोकळा करून द्यावा, एमआयटी संस्थेने शासकीय परवानगीशिवाय मुळा-मुठा नदीत बांधलेला विश्वराज बंधारा काढून टाकावा. ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक ११३ मधील १८ एकर जागेची शासकीय मोजणी करून तेथील नदीपात्रातील जागा वगळून उर्वरित जागेवर अत्याधुनिक कचरा वर्गीकरण प्रकल्प, नदी सुधार प्रकल्प, उद्यान व खुली व्यायामशाळा उभारण्यात येणार आदी ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
सर्व ठराव तत्काळ शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. येथील ग्रामदैवत श्री अंबरनाथ देवाचा वार्षिक उत्सव २ एप्रिलला होणार आहे. त्यामुळे कचऱ्याचा त्रास होऊ नये म्हणून एका संस्थेशी बोलणी करण्यात आली असून ती साठलेला कचरा उचलून नेऊन त्याची विल्हेवाट लावणार आहे.
- नागेश काळभोर, प्रशासक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.