सुवर्णा कांचन : सकाळ वृत्तसेवा
उरुळी कांचन, ता. २१ : अष्टापूर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गोतेमळा ते डाशीवस्ती हा अर्धा रस्ता मुसळधार पावसाने वाहून गेला आहे. हा रस्ता दरवर्षी होणाऱ्या मुसळधार पावसामुळे वाहून जात असल्याने या रस्त्याला अधिक मोऱ्या बनविण्याची मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
अष्टापूर ग्रामपंचायत हद्दीतील गोते मळा ते डाशी वस्ती दरम्यानचा रस्ता हा जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारितील असून, या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामध्ये हा रस्ता अर्धा वाहून गेला आहे. परिणामी, अर्धा रस्ताच वाहून गेल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. हा रस्ता साधारण दोन किलोमीटरचा असून, तो अष्टापूर- उरुळी कांचन या मुख्य रस्त्याला येऊन मिळतो. हा रस्ता पावसाच्या पाण्याने वाहून जात आहे. तसेच, सोबत रस्त्याशेजारी असलेल्या विलास बाबूराव कोतवाल यांचा ऊसही वाहून गेला आहे. या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा रस्ता पक्का करून काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अष्टापूर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गोते मळा ते डाशी वस्ती हा अर्धा रस्ता वाहून गेला आहे. आमच्या विभागाने पाहणी करून बांधकाम विभागाकडे या रस्त्याचा प्रस्ताव पाठवला आहे. निधी उपलब्ध झाल्यास या रस्त्याच्या कामाला सुरुवात करणार आहोत.
- अभिषेक धुमाळ, सहायक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
दरवर्षी गोते मळा ते डाशी वस्ती हा रस्ता मुसळधार पावसाने वाहून जातो. अष्टापूर गोते मळा रस्त्याच्या पुलावरील मोऱ्यांची संख्या वाढवावी. त्यामुळे पुढील वर्षी तरी हा रस्ता वाहून जाणार नाही. अर्धा वाहून गेलेल्या रस्त्याचे काम बांधकाम विभागाने लवकर पूर्ण करावे.
- सोमनाथ कोतवाल, माजी उपसरपंच, अष्टापूर (ता. हवेली)
गोतेमळा ते डाशीवस्ती रस्ता
अंतर- २ किलोमीटर
खड्डे संख्या - अर्धवट वाहून गेलेला रस्ता
मागील तीन वर्षातील खर्च - ३० लाख
नवीन निधी - अद्याप नाही
03331