वडगाव निंबाळकर, ता. ११ ः पिकांच्या वाढीसाठी शेतकऱ्यांना युरिया खताची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. मात्र, शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार युरिया खत खरेदीसाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक खत विक्रेत्याच्या प्रणालीशी लिंक करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया सध्या अडथळ्यांत अडकली आहे, परिणामी युरियाची विक्री पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
शासनाकडून पर्यायी उपाय म्हणून नॅनो डीपी आणि नॅनो युरिया यांची विक्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, पारंपरिक युरियावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना या नव्या स्वरूपातील खतांबाबत अद्याप विश्वास वाटत नाही. त्यामुळे या नॅनो युरिया बाटल्या दुकानदारांच्या दुकानात पडून राहिल्या आहेत.
याशिवाय, अनेक दुकानदार युरिया देताना शेतकऱ्यांकडून अनावश्यक खते किंवा कीटकनाशकांची सक्तीने खरेदी करायला लावत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. महाग झालेली खते आणि बियाणांच्या खर्चात अधिक वाढ होत असून, शेतकऱ्यांवर आर्थिक भुर्दंड येत आहे. सरकारच्या तांत्रिक अडथळ्यांनी आणि दुकानदारांच्या मनमानीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
येथील शेतकरी सुनील जायपत्रे यांनी सांगितले की, ‘‘शासनाने तातडीने आधार लिंकिंग प्रणालीतील अडथळे दूर करावेत, तांत्रिक पर्याय सक्षम करावेत आणि युरियाची नियमित व पारदर्शक विक्री सुनिश्चित करावी. अन्यथा याचा थेट फटका पिकांच्या उत्पादनावर आणि पुढील बाजारपेठेवर होणार आहे.’’
कृषी विभागाचे दुर्लक्ष
संबंधित विभागाचे अधिकारी यांचे विक्रेत्यांवर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होत आहे. आपल्या दुकानातून अधिकतम औषधांची खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना युरिया दिला जातो. याची चौकशी व्हावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
दुकानदारांकडे यासाठी कंपनीकडून आधार लिंकिंगसाठी आवश्यक मशिन उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे आधार क्रमांक प्रणालीशी लिंक होत नाही. त्यामुळे खत विक्रेत्यांनाही विक्री करता येत नाही.
- सतीश मुंडे, खत विक्रेते, वडगाव निंबाळकर
विविध कंपन्यांकडून विक्रेत्यांना मशिन देण्यात आल्या आहेत. त्याचे अपडेशन नसल्यामुळे अशा त्रुटी उद्भवू शकतात. मात्र, लिंक होत नाही म्हणून खते विक्री थांबवू नये. याबाबत आम्ही तातडीने दुकानदारांना सूचना पाठवत आहोत.
- निरीक्षक महेश, गुणवत्ता निरीक्षक, बारामती कृषी विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.