वेल्हे, ता. ३० : शिक्षण विरोधी धोरणाच्या निषेधार्थ शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी (ता. ३०) आक्रोश मोर्चा काढला. यामध्ये राजगड तालुक्यातील २७६ शिक्षकांनी सामूहिक रजा घेत १११ शाळा बंद ठेवल्याची माहिती राजगड तालुक्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनी दिली.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडून सतत दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये मुलांना शिकवायचे सोडून शिक्षकांना इतर कामात लावणे, अशैक्षणिक कामे बंद करावीत, दुर्गम भागातील वीस पेक्षा कमी पटाच्या शाळेवर निवृत्त शिक्षक किंवा कंत्राटी शिक्षकांची नेमणूक करणे, जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा विविध मागण्यांसाठी सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले. यामध्ये तालुक्यातील शिक्षकांनी प्रतिसाद देत सहभाग घेतला.
राजगड तालुक्यातील आकडेवारी
एकूण केंद्र - १६
एकूण प्राथमिक शाळा - १४२
सामूहिक रजेमुळे बंद ठेवलेल्या शाळा - १११
सुरू ठेवलेल्या शाळा - ३१
केंद्रातील एकूण शिक्षक - ३१९
सामूहिक रजेमध्ये सहभागी झालेले शिक्षक - २७६
शाळेवर उपस्थित शिक्षक - ३८
राजगड (वेल्हे) तालुक्यातील दुर्गम व डोंगरी भागातल्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या कमी असून येथील विद्यार्थ्यांना त्यांचा शिक्षण हक्क मिळवून देण्यासाठी केवळ जिल्हा परिषदेच्या शाळा या एकमेव पर्याय आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या या जिल्हा परिषदेच्या शाळेतील पट कमी आहे म्हणून सरकारने शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये राजगड तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक सहभागी झाले होते.
वसंत हारपुडे, अध्यक्ष, वेल्हे तालुका प्राथमिक शिक्षक संघटना
शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा भडिमार केला असून अनेक शिक्षकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडविण्याचे काम शासन करत असल्याचे चित्र आहे. हे सर्व वेळीच रोखून शिक्षकांचा जास्तीत जास्त वेळ विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी हा आक्रोश आहे, याची दखल शासनाने घ्यावी व विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करावे.
- सुरेश कोळी, अध्यक्ष, राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना, राजगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.