वेल्हे, ता. २० : दळणवळणाच्या साधनांअभावी गुंजवणी धरण खोऱ्यातील घेवंडे (ता. राजगड) व गेळगणी, तसेच डोंगर माथ्यावरील वाड्या वस्त्यांवरील विद्यार्थी शिक्षणापासून गेल्या महिनाभर वंचित आहेत. नागरिकांनाही मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. याबाबत आमदार शंकर मांडेकर, खासदार सुप्रिया सुळे यांनी पाटबंधारे विभागाला तातडीने बोट सुरुवात करण्याचे पत्र दिले आहे.
धरण भागातील बॅकवॉटर परिसरामध्ये पावसाळा सुरू झाला की मोठ्या प्रमाणात पाऊस पडून पाणीसाठा होतो. यामुळे या गावांकडे जाणारा रस्ता पाण्याखाली जातो. पर्याय म्हणून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी बोट सेवा सुरू केली जाते. मात्र यावर्षी जलसंपदा विभागाला वारंवार बोट सुरू करण्याच्या विनंती करूनही बोट सुरू झाली नसल्याचे निवी घेवंडेचे माजी सरपंच विकास कडू यांनी सांगितले.
धरणात घेवंडे ते निवी अशी बोट सेवा सुरू केली जाते, त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी निवी गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळेत ये जा करता येते. तसेच रहिवाशांना रेशन बाजारहाट करण्यासाठी व रुग्णांना औषध उपचारासाठी वेल्हे, नसरापूर (ता. भोर) येथे जाता येते. यंदा १५ मे पासून पाऊस पडत आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यातच घेवंडे ते निवीचा रस्ता बुडाला. तेव्हापासून धरण खोऱ्यातील रहिवाशांचे हाल सुरू झाले आहे.
याबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष किरण राऊत म्हणाले, ‘‘शंकर मांडेकर यांनी संबंधित विभागाला पत्र दिले आहे.’’ तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सरचिटणीस प्रदीप मरळ यांनी सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून संबंधित विभागाला तत्काळ बोट सुरू करण्यासाठी पत्र दिले असल्याची माहिती दिली.
याबाबत गुंजवणी धरण विभागाचे उपअभियंता नयन गिरमे म्हणाले, ‘‘कानंद ते घेवंडे या बारमाही रस्त्याचे काम सुरू आहे. संबंधित ठेकेदाराला वेळोवेळी सूचना देऊनही त्याने धरणग्रस्तांसाठी बोट सुरू केली नाही. त्यामुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. धरणग्रस्तांची गैरसोय टाळण्यासाठी जलसंपदा विभागाकडून दोन दिवसात बोट सुरू केली जाणार आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.